हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

जलपर्यटन, रोमांस, फ्रेंच उच्चार, अंतर्मुख करणारी नाती..!!पॅरिस स्थलदर्शन-भाग 4 उत्तरार्ध

https://www.instagram.com/reel/CwDijw3prA7/?igshid=MzRlODBiNWFlZA==

पॅरिस स्थलदर्शन-भाग 4 उत्तरार्ध
लुव्रच्या माहितीपूर्ण भेटीनंतर, भरपेट दुपारचे जेवण करून,संध्याकाळच्या
 उंबरठ्यावर,आम्ही सीन नदीच्या किनार्‍यावर बोटीच्या सफरीला 
(जलपर्यटनाला) गेलो. पॅरिसमध्ये आम्हाला जोडले गेलेले नवीन 
प्रवासी,थोडे पेंगुळलेल्या अवस्थेत होते. पण बोटीतून आयफेल टॉवर 
पण दिसतो हे ऐकल्यावर सगळेच थोडे उत्साहित झाले.
पॅरिस शहरातील सर्वात प्रसिद्ध सिन  ही नदी फ्रान्समधून वाहणारी 
प्रमुख नदी आहे.(सेन असाही उच्चार आहे,पण मराठीत तिला 
सिन असेही म्हणतात म्हणे... बरोबर काय हे फ्रेंच लोक आणि ती 
सरिताच जाणे 🤪)..पॅरिस शहर ह्या नदीच्या काठी वसलेले आहे.
तर जेवणानंतर आम्ही तिच्या तिरावर पोहोचलो.  आणि प्रथम 
दर्शनी ती मला मुळा-मुठेची 🏞मोठ्ठी बहिण वाटली (फक्त जरा अंगाने 
भरलेली, संसारात स्थिरस्थावर झालेली होती इतकेच)!!
सिनच्या किनार्‍याने जगभरातली लोकांना,विशेषतः प्रेमींना 
शतकानुशतके मंत्रमुग्ध केले आहे आणि रोमँटिक 💒फेरफटका
 मारण्यासाठी हा किनारा अगदी सर्वोत्तम ठिकाण आहे असे खूप 
ठिकाणी मी वाचलेले होते.
बोटीमध्ये जाण्यासाठी तोबा गर्दी होती.बरेचसे आमच्यासारखे पर्यटक 
होते...आणि अर्थातच इथेही भल्या मोठ्या रांगेत उभे राहावे लागणार 
होते.आम्ही आता रांग लावायला चांगलेच सरावलेले होतो.(रांगेत 
घुसणारे काही युरोपियन होते..पण पुण्याची लोक रांगा भेदून पुढे 
जाण्यात एकदम अभिमन्यु असतात हे आता त्यांनाही कळले असेल.)
एकदम एखाद्या एक्सपर्टसारखा-आमचा पूर्ण ग्रुप रांगेत उभा राहिला.
सर्वजण बोटीत चढल्यावर कुठे बसायचे आणि आपल्या ग्रुपच्या 
बाकीच्या मेंबर्ससाठी कुठे रुमाल टाकून ठेवायचा ह्याचे डिस्कशन 
चालू होते.(ही आपली-म्हणजे भारतीय लोकांची स्पेशालिटी आहे,
असे फक्त आपल्यालाच वाटते. पण लाल डब्यात खिडकीतून 
रुमाल टाकून आपल्या इथे जागा पकडतात तसे तिथे स्कार्फ,
टोप्या किंवा स्टोल टाकून इतकच...थोडक्यात काय...इथून 
तिथून सगळे मानव, जागेसाठी-खुर्चीसाठी🪑 सारखेच हपापलेले)
बोट आल्यावर आम्ही,अर्थातच वरच्या डेक वर गेलो आणि ज्यांना 
बोट लागते ते खाली बसले.
वरून खूपच सुंदर दिसतं असे ऐकले होते.वर गेल्यावर कुलकर्णी काका, 
ज्योती काकू आणि प्राची आमच्या जवळच बसलेले होते.
ट्रीपमध्ये समवयस्क लोकांशी आपले जमतेच पण आपल्या इतकेच
 उत्साही, गप्पिष्ट आणि हौशी लोक आपल्या सोबत असतिल तर 
आनंदी ट्रीप अविस्मरणीय ही होते. कुलकर्णी,पेंडसे, साठे, महाजन,
 डहाळे,देशपांडे,घाटे ह्या सर्व कुटुंबीयांमुळे 📸 फोटो काढणे,
आजुबाजूला दिसणार्‍या गोष्टीवर, स्थळांबद्दल माहिती देणे घेणे 
आणि कधीतरी...काही वैयक्तिक आठवणी शेअर करणे ह्यामुळे 
खरे तर ह्या सगळ्यांमुळे आमच्याबरोबर आमचा ट्रिपचा आनंद 
द्विगुणित होत होता एवढे नक्की!!
आता संध्याकाळचे 5.30  वाजत आले होते आणि टकटकीत सूर्य 🌞 
आमच्याकडे चांगलेच लक्ष ठेवून होता.
जशी राइड चालू झाली तस-तशी इंग्रजीमध्ये, आजुबाजूला 
दिसणार्‍या पॅरिसबद्दल,तिथल्या स्थळांबद्दल माहिती कानावर
 पडू लागली. नेपोलियन,  ओर्लेयों (ह्यांचे उच्चार भलतेच असतात
 ह्याचे इंग्रजी मध्ये Orleans असे लिहितात...एकंदरीत फ्रेंच
 भाषेत बोलण्यासाठी जीभ वळत नव्हती एवढे खरे)  
जोन ऑफ आर्क (शाळेत शिकवलेला तिचा धडा), 
टेल ऑफ टू सिटीझ् ह्या सगळ्यांबद्दल कुठे कुठे वाचलेले 
आणि वर्णन केलेले फ्रांस, तिथले कोर्ट,नॅशनल असेंब्ली, 
इनव्हॅलाइड्स, म्युसी डी'ओर्से आणि नोट्रे डेम डी पॅरिस यासारख्या 
शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणच्या खुणा आम्ही ह्या 
राइडमध्ये बघू शकलो,अर्थातच लांबून.!
मला मात्र मजा वाटत होती त्या नदीवर असलेल्या अनेक 
पुलांच्या खालून जाताना.!! एक तर त्या पुलांच्या कमानीवर 
अनेक अनोळखी लोक, उभे राहून, बोटीतून जाणाऱ्या प्रवाश्यांना 
हात हलवून,हसत बाय करायचे...काय नात होतं त्यांच आमच्याशी??!! 
काहीच नाही..पण ज्या प्रसन्नतेने सस्मित ते हात हलवत ते
 पाहून हळू-हळू आम्हा सगळ्यांचेच हात हलू लागत आनंद 
ही संसर्गजन्य असतो...जणू ती प्रसन्नता आम्हाला जोडत होती. 
आणि दुसरे म्हणजे सर्वच पुलांच्या कमानीवर दोन्ही बाजूला 
विविध योद्धांची सोनेरी शिल्प होती. अतिशय बारकाईने केलेले 
शिल्पकामाला सोनेरी झळाळी मिळत होती...संध्याकाळच्या
 प्रकाशात ती अप्रतिम, चमकदार अशी दिसत होती. 
आणि बघता बघता आम्हाला तो दिसू लागला... आणि 
क्षणोक्षणी तो जवळ येऊ लागला.... त्याचे बिंब पाठीशी दिसेल
 असे फोटो काढण्यासाठी स्पर्धा चालू झाली आणि तो म्हणजे
 पॅरिस शहराचा सर्वात मोठा आकर्षित करणारा आयफेल टॉवर!!
मग आम्हीही त्याला पाठीशी ठेवून फोटो काढले(शेवटी शास्त्र असते ना ते😁😎)
पॅरिससारख्या धावपळीच्या,गर्दी असलेल्या शहराच्या 
किनार्‍याची ही शांततापूर्ण आणि तरीही तेव्हढीच रोमांचकारी
आणि प्रसन्न दृश्ये देणार्‍या ह्या सिन नदीच्या ह्या क्रूझचे, 
तिथल्या हवेचे, वातावरणाचे वर्णन कसे करणार?? 
मला राहून राहून अपूर्वाई आणि पु.ल.आठवत राहिले.
किनार्‍यांवर बरीच कुटुंबे आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवत 
होते...काही ठिकाणी वाइन 🍷 चे घुटके घेत, तर काही ठिकाणी 
चक्क एकमेकांबरोबर नाचत-गात आनंद साजरा करत होते....
खरे म्हणजे ते जगणे साजरे करत होते...आपल्या-हम आपके 
है कौन सारखे एकत्र येऊन,गाणी म्हणत, गप्पा मारत सुख 
दुःखाच्या गोष्टी करत वेळ घालवणारी ही लोक पाहून, 
मला वाटले, खरच...पोट कसेही भरता येते पण काळीज 
भरायला...आपली काळजी करणारे...नव्हे, 
आपली काळजी घेणारे आपले लोक आपल्याला लागतातच नाही??!!
कुठल्याही शब्दांचा खरा अर्थ शब्दकोशात सापडतच नाही 
तिथे सापडतात ते प्रतिशब्द....शब्दांचा खरा अर्थ जीवनातच सापडतो
... अनुभवात सापडतो....हे पु. ल. म्हणतात ते काही खोटे नाही...
ह्या प्रवासात खूप मजा आली... नेहमीप्रमाणे विनोद झाले, 
गाणी पण म्हटली पण ह्या प्रवासात अंतर्मुख व्हायला झाले होते...

इथून झाली आमच्या सिन सफरी ला सुरुवात 

क्रुझ चे तिकीट 

उत्तम रंगसंगती असलेली शिल्पकला 

गप्पा मारत किनाऱ्या वॉर विसावलेले फ्रेंच लोक 

नित्याचीच फोटो काढायची झुंबड 

किनाऱ्यावर उत्साहात चाललेले गाणे आणि नृत्य 

 किनाऱ्यावरील पुलाच्या खांबावरील शिल्पे !

एका पुलाची सुशोभित केलेली कमान 

हाच तो आयफेल टॉवर ..!

त्याचे सर्व अँगलने फोटो काढण्यात सगळे गर्क 

सोनेरी झळाळी 

वरच्या डेक वरचा बोटीचा फक्त अर्धा भाग 

अस्मादिक आणि सुपुत्र 

असाच कॅन्डीड काय म्हणतात तसा 



झिम्मा मध्ये म्हंटले आहे तसे....प्रवासात माणूस जुन्याचा 
नवीन होतो....आमच्यातल्या ह्या नावीन्याचे स्वागत करत होतो. 
आम्ही त्याच सिनेमातील 🎥 गाण्यासारखे....
हसर्‍या वाटा घेऊन सोबती.... आजची सफर मनात साठवताना...
उद्याची स्वप्ने बघत बघत आम्ही हॉटेलकडे निघालो. 

७ टिप्पण्या:

  1. प्रवास वर्णनात पुल चा वारसा मस्त चालवत आहात, बढीया

    उत्तर द्याहटवा
  2. मनःपूर्वक आभार!! त्यांचा वारसा चालविण्याचा प्रयत्न आपण सर्वच जण फक्त करू शकतो....त्यांच्या लिखाणाची आठवण ठायी ठायी आली ...!! 😊

    उत्तर द्याहटवा