हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

जानराव, बिझनेस क्लास,युरो स्टार आणि डॉक्टर साठे

 यूरोप टूर भाग 4 -पूर्वार्ध 

सकाळी 8.01 वाजता आम्हाला यूरोस्टार रेल्वे पकडायची असल्याने 
सर्वच सकाळी लवकर तयार झाले होते....हॉटेल सोडताना त्यांनी 
आम्हाला पॅकेट ब्रेकफास्ट दिला होता....आणि दरवाज्यात अतिशय 
स्टाइलिश जॉनची तितकीच मोठी आणि स्टाइलिश गाडी आम्हाला 
स्टेशनवर सोडायला सज्ज होती. (ह्या जॉनच नाव मी 
जानराव- वऱ्हाड निघालाय लंडनला स्टाइल,ठेवल होत...
आमच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे तो फारच मस्त आणि विनोदी द्यायचा) 
श्रीदेवने परत एकदा स्टेशनला गेल्यावर करायची सगळी प्रक्रिया 
समजून सांगितली.आम्हाला पॅरिसमध्ये (स्टेशन बाहेर) 
विनायक वाकचौरे घ्यायला येणार होते. लंडन स्टेशनवर पोहोचून 
श्रीदेवला बाय करत आम्ही एयरपोर्टवर असते तश्या तिकिटे 
चेक करण्याच्या लाइनमध्ये उभे राहिलो....अस्मादिक सर्वात पुढे
....माझ्या बरोबर पेंडसे आणि कुलकर्णी कुटुंबिय ही होते. तिकिटे 
स्कॅन झाल्यावर पुढे सामान चेक इन मध्ये तपासून घेऊन पुढे 
प्लॅटफॉर्मकडे घेऊन जायचे हे माहीत होते. म्हणून नंबर येताच मी 
आणि मधुरा काकू पटकन पुढे गेलो. तिथून 4 पायर्‍या चढून 
आतल्या रांगेत उभे राहिलो...आमच्या चेहर्‍यावर आपण 
सगळ्यांमध्ये सर्वात पुढे (किंवा पहिले आलो)असा एक 
बालसुलभ आनंद होता. आणि एकमेकांबरोबर हेच बोलत 
हसत, टाळ्या देत आम्ही पुढे सरकलो....बाकीच्यांची तिकीटे 
स्कॅन करण्याची रांग बंद केली होती....त्यावरुन आम्ही 
लांबूनच त्यांना चिडवत होतो......आणि काही समजायच्या आत 
आमच्या मागचा दरवाज्या बंद झाला.... बापरे...!!
सिनेमॅटिक का काय म्हणतात तशी स्तब्धता पसरली....
आम्ही दोघी पुढचे काही क्षण एकमेकींकडे बघत बसलो....
आणि आता जर आपली सर्व मंडळी बाहेरच राहिली 
तर काय होईल असे वाटून गेले.....दरवाज़ा कधी उघडेल 
काय माहीत( का उघड दार देवा आता म्हणावे लागेल असे वाटले)
....त्यात आम्हाला चेक इन पोस्ट वर पाठविण्यात आले...
आणि तिथल्या ऑफिसरमुळे आम्हाला कळले की आम्ही 
दोघी बिझनेस क्लासच्या रांगेत होतो...आम्ही दोघीही 
(अगदी समसमान बिनधास्त आणि बोलक्या) आजूबाजूच्या 
सर्व लोकांचे निरिक्षण (अर्थातच पुणेकरांना परीक्षण वेगळे 
करावे लागत नाही....खऱ्या पुणेकराला ही सिद्धि जन्मजात असते)
 करत त्यांच्यावर भाष्य करत होतो...मराठी आजुबाजूला 
कोणालाच कळत नसल्याचा फायदा लंडनमध्ये खूप कमी 
होतो कारण तिथे जाऊ तिथे मराठी माणसं भेटतात...
आता चेक इन पण होत आले आणि बाकीचे सगळे अजूनही आलेले नव्हते....
तेवढ्यात मागचा दरवाजा पुन्हा उघडला आणि आमचे 
सहप्रवासी पुढे आले (इकॉनॉमी क्लास च्या लाइन मध्ये). 
आणि आम्ही अंडरग्राउंड प्लेटफॉर्मवर पोहोचलो... 
आत्तापर्यन्त एयरपोर्ट सारखे वाटणारी ही जागा अचानक 
रेल्वे स्टेशन सारखी वाटू लागली....कारण ज्या लोकांना 
बसायला खुर्च्यावर जागा नव्हती ते स्वतःच्या सामानावर
 .... किंवा चक्क खाली बसले होते....म्हटले हम भी तशरीफ रख ही देते है |
ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली,आम्ही जोशींच्या तज्ञ(😎) 
मार्गदर्शनाखाली सामान व्यवस्थित लावून त्या सुबक 
आखीवरेखीव अत्याधुनिक गाडीत आपापल्या सीटवर 
स्थिरस्थावर झालो. गम्मत म्हणजे आम्हाला लंडनच्या 
रेल्वे स्टेशनवरच तिथून बाहेर पडल्याचा आणि फ्रांसमध्ये शिरल्याचा 
 स्टॅम्प मिळाला....एकंदरीत आम्हाला इंग्लैंडने एक्सपोर्ट केले होते 
आणि तिथेच फ्रांसने इम्पोर्ट ही केले....एकाच ठिकाणी 
वेगवेगळ्या देशात देवाणघेवाण झालेले आम्ही एकमद्वितीय स्पीशीझ़्र होतो.!

डावीकडून -सूरपूरिया काकू, गांधी काकू, देशपांडें काकू आणि अत्रे काकू 


डॉक्टर साठे काका ...(लंडनमध्ये) शाह रुख खान स्टेप करताना  


हमारे प्रिय - जान राव (मिस्टर जॉन) 


फ़्रान्स रैल्वे स्टेशन वर विनायक सरांची वाट पाहताना 

 
माझ्या सेल्फी काढायच्या केविलवाण्या धडपडीची कीव येऊन 
एका पोर्तुगीज बाईने "मी काढू का तुझा फोटो?" असे विचारले 
आणि नेकी और पूछ पूछ म्हणत मी ही तयार झाले. 
(अर्थात थोड्या वेळाने मी तिचे तिच्या मैत्रिणीबरोबरचे फोटो 
काढून त्याची फिट्मफाट करून टाकली.आणि भारतीय 
लोक जास्त चांगले फोटो काढतात हेही पटवून दिले. )
आमच्या जवळच बसलेला चिरतरुण मुलींचा (अत्रे काकू, 
देशपांडे काकू, सूरपूरियां काकू आणि गांधी काकू ह्यांच्या 
सीटवर हास्याची कारंजी चांगलीच उंच उडत होती....
त्यांची धमाल पूर्ण बोगी ऐकत होती. अर्थातच त्यांच्या 
टेबलवरचा खाऊ मला चाखायला मिळाला!! आणि 
ह्या चौघांचा एक धमाल हसताना एक फोटो मला काढता आला. 
युरोस्टार च्या ह्या रेल्वे प्रवासाबद्दल ही खूप कौतुक ऐकून वाचून होते
....एका बलाढ्य राष्ट्राच्या राजधानीला(लंडन) दुसर्‍या 
तितक्याच मोठ्या देशाच्या राजधानीला(पॅरिस) जोडणारी ही ट्रेन
....तिला स्टार म्हणणेच योग्य आहे. असे म्हणतात की ह्या
 रेल्वे ने तुम्ही विमानापेक्षा ही लवकर पॅरिसला पोहोचता 
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खिशाला परवडणारीआहे 
अर्थातच विमानापेक्षा) आणि वेळ वाचवणारी आहे. 
 युरोस्टार, ले शटल ह्या समुद्राखाली असलेल्या सर्वात लांब
 38 किलोमीटर) टनल मधून आपल्याला ताशी 160 कि मी 
ह्या वेगाने नेते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ना 
आपल्याला हा वेग जाणवतं ना आपण समुद्रा खालून 
जातो आहोत हे जाणवते. 
ह्या प्रवासातला एक प्रसंग माझ्या कायम लक्षात राहील.
प्रवास अर्धा संपलेला असताना अचानक एक घोषणा ऐकू आली 
की बिझिनेस क्लासमध्ये एका बाईंची तब्येत बिघडली आहे
 आणि कोणी डॉक्टर ह्या रेल्वेत असल्यास त्यांनी त्वरित 
तिथे यावे. बरेच जण डुलकी काढत होते त्यामुळे आमच्यातल्या 
डॉक्टर साठे काकांनी ते ऐकले नाही...ज्योती कुलकर्णी काकूनी (त्या नेहमीच अलर्ट असतात)
मला साठेकाकांकडे पिटाळले आणि मी(नेहमीच्याच तडफदारपणे😁)
 त्यांच्याबरोबर जवळजवळ धावत त्या डब्यात गेले. 
तिथे गेल्यावर अर्थातच डॉक्टर साठे काकांनी प्रासंगिकता राखून,
त्यांना तपासले, त्यांची सर्व विचारपूस करून.....त्यां
च्या आजारांच्या इतिहास जाणून...त्या बाईंना होत अ
सलेल्या त्रासाचे निदान केले.आणि योग्य औषध सुचवून 
तिथून निघालो. एकदम घाबरगुंडी उडालेल्या त्या बाई 
खूपच शांत झाल्या....त्यांनी अनेक वेळा डॉक्टर काकांचे 
धन्यवाद मानले.....खरच... डॉक्टरांना आपल्या संस्कृतीत 
उगाचच देवाची उपमा दिली नाहीये....!! 
साठे काकांनी ज्या आत्मियतेने प्रेमाने प्रसन्नतेने हे सगळे 
केले त्याला मनोमन सलाम केला...आणि आमच्या बोगीत 
त्यांचे स्वागत आमच्या सर्व ग्रुप ने टाळ्या वाजवून केले..
आणि मी ,जणू मीच पेशंटला बरे करून आल्याच्या दिमाखात 
आमच्या डब्यात त्याच्याबरोबर परतले आणि हा चित्तथरारक 
अनुभव सगळ्यांना रंगवून सांगू लागले. अर्थातच त्या वेळी 
ह्या सगळ्याचा एक आठवण म्हणून एखादा फोटो किवा
 ह्या सगळ्याचा वीडियो काढावा असे काहीही डोक्यात आले नाही. 
(म्हणून डॉक्टर साठे काकांचा शाहरुख खान स्टाईलमध्ये 
उभे असलेला फोटो शेअर करते आहे.)
एक मात्र झाले.....त्या बाईंना बघायला गेल्यामुळे आम्हाला
 यूरोस्टारचा बिझनेस क्लास किती पॉश, सुंदर,ऐटबाज असतो,
 त्यातल्या सोयी सगळेच बघता आले. 
लंडन पॅरिस युरो स्टार ट्रेनचा प्रवास (सुमारे 2 तास15मिनिटे)
अनुभवण्यासारखा होता. आपल्या आताच्या वंदे भारत गाड्यांची 
आठवण होऊन आम्ही आमची कॉलर ताठ केली. 
पॅरिसचे रेल्वे स्टेशन आताच्या मुंबईच्या CST ची आठवण 
करून देत होते...एकदम विंटेज लूक होता स्टेशनचा पण सुविधा
 अत्याधुनिक!! अर्थात इथे कमालीची स्वच्छता होती. 
विनायक वाकचौरे ह्यांना फोन करून, तिथून सामान 
घेऊन बाहेर आलो,आमच्या पॅरिसपासूनच्या सहप्रवाश्यांना
(हे नुकतेच भारतातून आल्यामुळे अतिशय पेंगुळलेल्या 
अवस्थेत होते सगळे) भेटून हुश्श झालं आणि पॅरिसचे स्थलदर्शन सुरू झाले.

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

यूरोप टूर भाग 3- चेंज ऑफ गार्डस, डेव्हिड, मादाम तुसाद आणि ऑस्कर ...!!

छोड दो आचल असे दीपिका देशपांडे काकांना म्हणाली तो क्षण !!


अँड ऑस्कर गोस टू ..... मादाम तुसाद मध्ये ऑस्कर समवेत वल्लभ !



लंडन च्या पार्क मध्ये गप्पांमध्ये बुडलेले आणि बालमित्राशी हितगुज करणारे
पेंडसे काका आणि डहाळे काका 


बकिंगहॅम पॅलेस मध्ये डेविड बरोबर आमचे जोशी कुटुंब 


हौशी उत्साही कुलकर्णी कुटुंब 

 यूरोप टूर भाग 3

टूरच्या पाहिल्या रात्री गाढ झोपलेले आम्ही लंडन फिरायच्या ओढीने उठलो खरं, 
पण आमच्यापैकी काहीजणांना जेट लॅग जाणवत होता 
(माझ डोकं झोप न झाल्यामुळे दुखत होतं आणि वल्लभला ॲसिडिटी
झाली होती). इतक सुंदर हॉटेल (ही गिरीकंदची खासियत होती हे संपूर्ण 
प्रवासात जाणवले) आणि तिथला आकर्षकपणे सजवून,रचून ठेवलेला 
ब्रेकफास्ट ह्याचा आनंद घेण्यापेक्षा उदरभरण करण्याचीच भावना 
जास्त होती. तिथे सूरपूरियां आणि गांधी काकू,घाटे काका काकू 
आणि देशपांडे आणि अत्रे काकू ह्यांच्याशी गप्पांचा फड रंगणारच होता ते
वढ्यात पेंडसे आणि साठे काका काकूंनी निघायच्या वेळेची आठवण 
करून दिली आणि कसे बसे ब्रेड बटर आणि फळे पोटात ढकलून 
आमच्या आलिशान गाडीत जाऊन बसलो.  
बकिंगहॅम राजवाड्याला आज आम्ही भेट देऊन दिवसाची 
सुरुवात करणार होतो. इतके काही ऐकलं वाचलं होतं  ह्या 
राजवाड्याबद्दल की इथे जाणे जवळजवळ अनिवार्य होतं. 
ज्यांनी जगावर राज्य केले अश्या इंग्रजांचे राजा-राणी ज्या 
राजवाड्यात राहत त्यांचा तो राजप्रासाद 
(बाहेरून का होईना) बघता येणे आणि त्यांचा चेंज ऑफ गार्डचे 
साक्षीदार होणे म्हणजे एक अभूतपूर्व अनुभव असतो असे 
खूपच वर्णन ऐकले होते. आमच्यातल्या सर्व तरुण (वय फक्त 60+) 
एकदम उत्साहात रॉयल पार्कमध्ये भराभर पॅलेसच्या दिशेने 
चालू लागले तर काहीजण फोटो स्टॉप घेत होते तेवढ्यात श्रीदेवचा 
आवाज आला....चेंज ऑफ गार्ड आत्ता चालू होणार आहे....
मग काय सगळेच जवळजवळ धावत जाऊ लागलो.....
खूप गर्दी तो सोहोळा बघायला. (आम्ही अश्याच प्रकाराचा सोहोळा 
दक्षिण कोरियामध्ये त्यांच्या पॅलेसमध्ये पहिला होता)
आणि खरोखरीच इतक शिस्तबद्ध, एका लयीत चालत, त्या 
संगीताला साजेश्या गतीत सर्व हालचाली सगळेच मोहक होत...
ह्या सगळ्याचा उत्तम समन्वय म्हणजे हा सोहोळा.....
उगाच नाही त्याचे कौतुक दुनियाभर!!
आमच्याबरोबर आज एक डेव्हिड (जन्माने अमेरिकन पण 
लंडनमध्ये स्थायिक) नावाचा गाइड होता. त्याच्या अतिशय 
खुमासदार शैलीत तो आम्हाला लंडन दाखवत होता.
 आमच्या चौकस (चौकस असणारच-अर्थातच पुणेकर 
आहोत ना) प्रश्नांची तो फारच तपशीलात उत्तर द्यायचा. 
त्याच्या बरोबर रॉयल पार्क मधून फेरफटका मारताना तिथल्या 
लोकांबद्दल, तिथे राहणार्‍या इतर देशातील लोकांबद्दल भरपूर 
माहिती मिळाली. सगळ्यात महत्वाचे इंग्रज लोकांविषयी, 
त्यांच्या धोरणांविषयी बर्‍याच गप्पा (खरं म्हणजे कमेंट्स) मारल्या. 
(अमेरिकन आणि भारतीयांचे एकमत आहे हे जर इंग्रजांना 
कळले तर काय राजकिय गदारोळ होईल ह्या विचाराने 
आम्ही आमची चर्चा आटोपती घेतली 🤣)
तिथून आम्ही मादाम तुसाद वॅक्स म्युझियम बघायला जेवणानंतर गेलो.
(आम्ही तिघांनी थायलंडला हे म्युझियम पाहिले होते पण 
original ते original असणार असा विचार करत आम्ही सगळयाबरोबर  
आत गेलो.) भव्य पायर्‍या चढताना आपणच कोणी सेलेब्रिटी असल्याचा 
फील येत होता. आतले असंख्य मेणाचे पुतळे बघताना 
त्यांची कारागिरी,त्यांची कल्पकता,तपशीलवार चेहर्‍याचा 
अभ्यास करून त्यातील सर्वात आकर्षक भाग अधोरेखित 
करून,त्याप्रमाणे मेणाचा पुतळा बनविण्याची कला - लाजवाब 
आहे ह्यात शंका नाही.(फक्त आपला सचिन आणि मोदीजी 
ह्यांचे पुतळे दिसले नाहीत..आता ते काढून टाकले आहेत, 
ह्याची खंत ही वाटली.) देशपांडे काकांनी काहीसा संकोचाने 
काढलेला, दीपिका पदुकोणच्या पुतळ्यासमोर (त्यांची आवडती 
आहे ना ती) थांबून दिलेल्या पोजचा, फोटो काढताना मजा वाटली 
(आणि मला माझ्या वडिलांची आठवण आली....
पपा असते तर त्यांनीही कदाचित असाच तिच्यासोबत 
फोटो काढला असता....) सर्व दालने अत्यंत विचारपूर्वक, 
त्यातील विषयानुसार बनवलेली आहेत, त्याला 
साजेशी प्रकाशयोजना, संगीत ह्या सगळ्यांचा  मनावर 
खूपच प्रभाव पडतो. इथे एक अशी राइड (सवारी) होती 
ज्यात तुम्ही लंडन जगप्रसिद्ध  (साहेबांचे सगळेच जगप्रसिद्ध!! )
 टॅक्सीमध्ये बसायचे आणि ह्या टॅक्सी, कन्वेयरवर 
असल्यामुळे स्वयंचलित होत्या आणि पूर्ण 360° डिग्रीमध्ये 
फिरायच्या....त्या  पुढे जात असताना तिथे 
आजुबाजूला आपल्याला लंडन, ह्या शहराची, इंग्लैंड ह्या 
देशाची वैशिष्टय़ आपल्याला भेटतात... शेक्सपियरपासून 
ते टॉवर ब्रिजपर्यन्त सर्व गोष्टी  इथे दिसतात. सगळी भ्रमंती 
झाल्यास आणि मनसोक्त आपापल्या आवडल्या 
सेलेब्रिटी बरोबबर (दुधाची तहान ताकावर ह्या उक्ती 
प्रमाणे त्यांच्या पुतळ्याबरोबर) फोटो काढून झाल्यावर
 आम्ही त्यांच्या विक्रीसाठी ठेवलेल्या स्मरणिका होत्या तिथे आलो...
आम्हाला ऑस्कर प्राप्त झाल ती हीच जागा. कलाकार पुरस्कार
विकत घेतात असं फक्त ऐकल होत....
इथे आम्ही प्रत्यक्षात अनुभवल... 😁 वल्लभ ने एक ऑस्कर 
विकतच घेऊन टाकले...आता ते आमच्या घरातल्या 
इतर बक्षिसांबरोबर उभे आहे.... बाहेर पडल्यावर समोरच 
रस्त्यावर असलेल्या, कॅफेमध्ये एका गोऱ्या बाईची साद ऐकून 
फारच बरे वाटले....ती चक्क ओरडत होती 
(तेही आपल्या भारतीय ठेक्यात) 
"गरम गरम चाय.. कडक कडक चाय .." आम्ही श्रीदेवकडे 
ह्याची मागणी करणार तेवढ्यात त्यानेच कॉफी किवा 
चहा अशी ऑफर दिली आणि कालची चहाची तलफ 
आज पूर्ण झाली. तोवर समोर सुंदर शुभ्र कॅडिलॅक दिमाखात उभी दिसली... 
मग काय वल्लभने गाड़ी बरोब्बर फोटो काढण्याचा श्रीगणेशा केला 
आणि हळूहळू ती सगळ्यांचीच झाली (निदान फोटो मध्ये तरी😜)
आता जेवायला भरपूर वेळ होता आणि त्या दिवशीचे स्थल 
दर्शन संपले होते. श्रीदेवने लगेचच आम्हाला जवळच्या 
एका सुंदर पार्कमध्ये नेले. आम्ही काही जण 
मस्तपैकी तिथल्या स्वच्छ मऊ हिरव्या गवतावर बसलो (पहुडलो ही). 
मनात सारसबाग आठवली...पण काही (अति उत्साही) 
श्रीदेव बरोब्बर ते पार्क बघायला गेले. 
त्यावेळी पेंडसे काका आणि डहाळे काका एका बेंचवर
इतक्या दिलखुलास गप्पा मारत होते की त्यांचे काही कॅनडीड 
फोटो खूप छान आले. प्राथमिक शाळेपासून 
मित्र असलेले दोघेही....मधल्या काळात भेटीगाठी कमी झालेले मित्र....
खूप वर्षांनी ह्या युरोपच्या टूर वर भेटले होते... त्यांच्या चेहर्‍यावरचा 
आनंद,उत्कंठा,प्रेम,समाधान...फोटोमध्ये टिपता आले नसेल कदाचित....
पण मनाला जाणवले हे नक्की....
आमच्या गप्पा, फोटो आणि बरेच हास्यविनोद झाले. 
लंडनच्या वातावरणाला मूडी का म्हणतात हे कळले.... 
कारण मध्येच एक पावसाची सर येऊन गेली....
आणि तरीही ही फिरायला गेलेली मंडळी येईनात.. 
आता अंधार पडू लागला होता... 
तोच सगळे एकदम उत्साहात आणि आनंदात परत आले...
त्यांना तिथे सुरेख फुलांचे ताटवे कारंजी दिसली होती. 
त्यांना ट्युलिपही दिसले. त्याचे वर्णन ऐकत आम्ही तिथून जेवायला निघालो. 
सर्वात वेगळी गोष्ट जाणवली ती म्हणजे....लंडनमध्ये 
कुठल्याही वेळी लोकं व्यायामासाठी पळताना दिसली... 
सकाळ- दुपार-संध्याकाळ अश्या कुठल्याही वेळी लोकं 
पादचारी मार्गावरून किंवा पार्कमध्ये धावत होती.
आता पुन्हा एकदा इंडियन जेवण करून हॉटेलला दमून 
भागून झोपायला आलो. लंडन मुक्कामी दुसऱ्या रात्री लवकर 
झोपायचे होते कारण तिसऱ्या दिवशी सकाळी 
युरो स्टार ट्रेनने आम्ही पॅरिसला जाणार होतो. युरो स्टारचा 
अनुभव घेण्यासाठी आम्ही उत्सुक होतोच पण त्या बरोबर
 इथून श्रीदेवला बाय करावे लागणार होते. त्याने 
श्री जोशी (अस्मादिकांचे पति) ह्यांना- त्यांचा शांत स्वभाव बघून (😁) 
आणि सगळ्यात वयाने लहान म्हणून (😎)
इंग्लंड ते फ्रांस (श्री विनायक भेटूतोवर) टूर लीडर केले होते. 
त्यामुळे आम्हाला सर्वात लवकर तयार होणे अपरिहार्य होते. 
लंडनमधल्या आठवणी मनाच्या बॅगेत हलकेच भरत 
आम्ही नवीन अनुभवासाठी तयार होत होतो...
लंडनमध्ये ठुमकून झाल्यावर(पूरा लंडन ठुमकदा...) आता 
फ्रांसमध्ये बाकिचे सहप्रवासी भेटणार होते....
युरोपची ही ट्रिप खऱ्या अर्थाने सुरू होणार होती..
फ्रांसच्या रोमांचक सफरीबद्दल (आणि तिथल्या 
आगळ्यावेगळ्या अनुभवाबद्दल ही) नंतर  सांगते......😉

बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३

लंडन - चहा,कोहिनूर,गांधी आणि बरेच काही.....

 युरोप ट्रीप भाग 2 

लंडन - चहा,कोहिनूर,गांधी आणि बरेच काही.....
विमानतळावरून बाहेर पडलो आणि तेव्हाच आपल्या बॅगा 
आणि सामान आपले आपल्याला वागवावे लागणार आहे हे 
लक्षात आले. भारतात असलेल्या गोष्टीचे किंवा व्यावसायिकांचे
 महत्व (विशेषतः पोर्टर किंवा कुली ह्यांचे) परदेशी गेल्यावरच कळते हेच खरे. 
प्रसन्न वातावरणात,अतिशय देखण्या, सुंदर, 
स्वच्छ आणि रुबाबदार शहराची सफ़र "गणपती बाप्पा मोरया" 
म्हणून चालू झाली. कमी होती ती गरम चहा ची....! 
लंडन मधला भरपूर ट्राफिक पाहिल्यावर पुण्याची आठवण 
आली नसती तर नवलच..पण आपल्यासारखे घणाघाती हॉर्न 
आणि "बाजुला सरकतोस का राहणार आहेस इथेच?" असा उपहासात्मक 
प्रश्न कुठेही ऐकायला मिळाला नाही हे विशेष. शहरा इतकीच आमची गाडी
 ही खूपच सुबक आणि सोयीची होती. एवढया मोठ्या (55 सीटर) गाडीत 
आम्ही फक्त 21 जण होतो त्यामुळे सगळेच एकदम ऐसपैस आणि आरामात 
बाहेरचे सौंदर्य डोळ्यात,मनात आणि बर्‍याचदा मोबाइलच्या कॅमेरामध्ये 
साठवत आम्ही फिरत होतो. श्रीदेव ह्याची माहिती सांगायची पद्धत खूपच 
रंजक होती. टॉवर ब्रिज, टॉवर पॅलेस, कोहिनूर हिरा याबद्दल आपल्या 
भारतीयांच्या मनामध्ये उत्सुकता असतेच पण तिथली लांबच लांब 
रांग बघताना वाटल की बराच वेळ जाईल....त्यात आमच्याकडे दिलेली 
तिकीट स्कॅन होईना.....चेक करणार्‍या बाईने आधी आम्हाला 
सर्वांना खालून वर न्याहाळून,तिच्या वरच्या अधिकारी बाईला बोलावले....
आणि तिकिटं वरील तारीख वेगळीच असल्याचे आणि ती उलटून 
गेल्याचे सांगितले.... आता आली का पंचाईत?!श्रीदेवने अर्थातच तोवर 
पुण्यात फोन करून आणि त्या पॅलेसच्या ऑफिस मध्ये जाऊन गोंधळ 
निस्तरला आणि त्या अधिकारी बाईने हसतमुखाने आम्हाला प्रवेश दिला. 
खूप वेळ जाईलअसे वाटत असताना आम्ही अवघ्या 15 मिनीटात आत गेलो
 आणि तिथला थोडा इतिहास सांगत श्रीदेवने आम्हाला खऱ्या अर्थाने चालते ठेवले.
 ( गिरीकंद ने दिलेला पॅकेट मधील नाश्ता देखील आम्ही चालत चालत उरकला) 
लंडनमध्ये गोऱ्या लोकांपेक्षा भारतीय पर्यटकांची संख्या प्रचंड जाणवली.
थंड वातावरण आणि कमालीची स्वच्छता ह्या दोन्ही गोष्टींमुळे चालायला फार 
त्रास होत नव्हता. ह्या टॉवर पॅलेसमध्ये शाळेतील विद्यार्थ्याची भेट होती. 
त्यांचे इकडे तिकडे बागडणे आणि शिक्षकांनी त्यांना शिताफीने एकत्र ठेवण्याचा 
प्रयत्न करणे पाहिले आणि मला माझ्या शाळेतील मुले आणि आम्ही 
केळकर संग्रहालयाला दिलेली भेट आठवली. एकंदरीत सगळीकडचे 
विद्यार्थी आणि त्यांचा दंगा करायची पद्धत कमी अधिक प्रमाणात सारखीच.... 
लंडन ज्वेलस् मधील एक एक राजमुकुट बघताना एकदा तरी इथल्या 
राजघराण्यात जन्मायला हवे होते असा विचार पुसटचा येऊन गेला. 
कोहिनूर हिरा 💎 अजि म्या ब्रह्म पाहिले अश्या अधाशीपणे दोन दोनदा पहिला....
तिथे फोटो अजिबात काढू देत नाहीत. त्यामुळे फक्त डोळ्यात साठवला आणि बाहेर पडलो. 
थेम्स नदीबद्दल,लंडनबद्दल अपूर्वाई आणि पु. ल. ह्यांच्यामुळे खूपच उत्सुकता होती. 
तिच्या काठावर उभे राहिल्यावर ती मुळा-मुठे ची थोरली (लग्नानंतर नांदायला 
परदेशी दिलेली) बहिण वाटली... (अगदी गढूळ पाण्याबाबत ही)
लंडन आय याबद्दल विशेष आकर्षण होतच कारण अख्ख्या लंडन शहराचे 
विहंगम दृश्य तिथून बघायला मिळते असे ऐकले आणि वाचले होते. 
मला वाटले होते की मला चक्कर येईल किवा गोल उंच फिरताना 
आमच्यातील कोणालाही त्रास होईल की काय...
पण त्या तिथल्या अर्ध्या तासात आम्हाला खूपच मजा आली....
आमच्या कॅपसुलच्या 360° मध्ये दिसणारे लंडन खरोखरीच विलोभनीय होते. 
गूगल च्या बॅकग्राऊंड इतके निळे आकाश, त्यावरचे तितकेच सुंदर पसरलेले ढग....
भोवताली अतिशय कुंद म्हणता येईल असे वातावरण, थेम्स नदी, 
पार्लमेंटचा परिसर बिग बेन....सगळच कस आखीवरेखीव....एखाद्या चित्रासारखे.. 
लंडनच्या प्रेमात कोणीही पडेल!!
ह्या लंडन आयमध्ये काटकोनात फोटो काढताना भरपूर कसरत करावी लागली...
भरपूर फोटो आणि त्याबरोबर सर्वांच्या गप्पा आजूबाजूच्या गोष्टीवर मत प्रदर्शन 
( पुण्याचे आहोत ना....प्रत्येक गोष्टीवर आपले ठाम मत द्यायला नको?) 
ह्यामुळे वेळ अगदी भर्रकन उडून गेला...तिथून पायी (अर्थातच हे वेगळे 
सांगायला नको कारण युरोपमध्ये खूप चालावे लागते हे सर्वांनाच माहीत आहे) 
आम्ही बिग बेन च्या दिशेने निघालो....त्या ब्रिज वरून जाताना रस्त्यावर 
जलरंग वापरुन काढलेली चित्रे, रेखाचित्रे छोटी छोटी फ्रिज मॅग्नेट अश्या अनेक 
गोष्टी विकायला होत्या. कलासक्त वातावरण होते...ट्रॅफिक भरपूर असूनही रस्त्यावर 
कुठलाही दंगा गोंगाट नव्हता (आम्हा सगळ्यांचा गगनभेदी हसण्याचा आवाज वगळता). 
मी असीम आणि वल्लभ जरा दुकानामध्ये वस्तू बघत रेंगाळलो... 
तेथील एकही दुकानदार- मादाम डू यू वाॅन्ट टू हॅव अ लुक एट दिज थिंग्स? 
असे- वैनी बघा की एकदा...असा माल कुठेही ह्या किमतीत मिळणार नाही. 
किवा बघायला पैसे पडत नाहीत ताई या ह्यापद्धतीने बोलावतो का हे पहिले.....
पण तसे काहीच घडले नाही!! अगदी पुणेरी बाण्याने तो सगळ्यांना 
वागवत होता (दुर्लक्ष करून). तिथे एका अरबी जोडप्याने मला फोटो काढशील
 का विचारले. अर्थातच मी फोटो काढला. आणि मग त्याने मला तुमच्या 
तिघांचा फोटो काढू का विचारले. आणि उत्साहात आम्हाला दोन तीन पोज सुचवत 
त्याने ही आमचे छान फोटो काढून दिले. प्रवासात असे रोमांचक काही घडले नाही तर काय मजा?!!
आमच्या ह्या फोटो सेशनदरम्यान आमचा ग्रुप पुढे गेला आणि आम्ही चहूबाजूला 
पाहिले तर कोणी दिसेना. मग इंटरनेशनल रोमिंग खरेच काम करते ते आपसूकच 
चेक झाले. आणि आम्ही बिग बेनचे वेगवेगळया कोनातून फोटो घेत, चहूबाजूंनी 
दर्शन घेत आम्ही पार्लमेंटच्या जवळील एका पार्कमध्ये ज्याला पार्लमेंट स्क्वेयर 
म्हणतात...तिथे सगळेच मस्त पाय पसरून निवांत बसलो. तिथे चर्चिल, नेल्सन 
मंडेला अश्या अंतरराष्ट्रीय कीर्तीच्या राजकीय व्यक्तिमत्वांचे पुतळे होते. तिथे 
आपल्या महात्मा गांधींचा पुतळा पाहून खूप बरे वाटले. तिथे फोटो काढायला गेलो तर 
एक इंग्रज त्या पुतळ्याला नमस्कार करतो आहे असा फोटो काढत होता हे बघून तर 
ऊर अभिमानाने भरून आले. 
आजुबाजूला आमच्यासारखी आरामात एकमेकांशी गप्पा मारत, हसत 
बसलेली माणसे बसलेली दिसली.....वाटले.... हे शहर त्यातली ही घाईघाईने 
कोठेतरी पोहोचण्यासाठी चालणारी माणसे काही क्षण विसावा घेतात तर!! 
तिथे जर ओली भेळ मिळाली असती तर काय बहार आली असती असे बोलले 
असता सगळ्यांनीच तोंडाचे पाणी पुसले. (आपणच इथे भेळेची गाडी टाकू 
आणि खूप कमवू असे आमच्यातील काही जणांनी छोटे स्वप्न बघितले....
मला तर गणपत वाणी आणि मुंगेरीलाल हे दोघे भेटल्याचा भास झाला) 
आत्तापर्यंत दिवसभर, सर्व ठिकाणी,गाडीमध्येही वल्लभ, श्रीदेवच्या 
सगळ्यांना चहा पाहिजे म्हणून जवळजवळ हात धुऊन मागे लागला. 
त्याची रि ओढत, भर म्हणून डहाळे काका, घाटे काका, देशपांडे काकू,साठे काका काकू, कुलकर्णी काकू, 
पेंडसे काकू सगळ्यांनीच-कॅलेंडर खाना दो च्या चालीवर श्रीदेव चहा दो अशी मागणी केली....
आणि श्रीदेवने (कदाचित आम्हाला वैतागून किंवा आमच्या मागणीला 
बिग बेन जवळील पार्क मध्ये गप्पांमध्ये रमलेले आम्ही सगळे 


टॉवर ब्रिज वरून लंडन आय 


लंडन आय मध्ये आमचे सहप्रवासी 



लंडन आय मधील कॅप्सूल मधला ग्रुप सेल्फी - शास्त्र असते ते 


जोशी कुटुंब - लंडन टॉवर ब्रिजपाशी 


फशी पडू ह्या भीतीने) आम्हाला रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये 
जाण्यासाठी बसकडे नेले....नाहीतर लंडनमध्ये एखादी चहाख्यायिका (चहाची आख्यायिका) 
रचली गेली असती हे नक्की. 
युरोप प्रवासातील बस, त्याचे चालक आणि त्यामध्ये पाळावे लागणारे नियम 
ह्यावर स्वतंत्रपणे लिहावे लागेल. एखाद्या कडक शिस्तीच्या 
मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्वात खोडकर मुलाकडे पहावे अगदी तसेच चालक 
आम्हा पामरांना न्याहाळायचा. गाडीत एखादी खाऊची प्लास्टिकची 
पिशवी-डबा उघडला गेला किंवा कोणी उभे राहिले की तो-गडाचे दरवाजे बंद झालेत..... 
असे बोलणार्‍या पहारेकर्यासारखे आता गाडी बंद असे म्हणायचा. 
दिसायला आणि वागायला एकदम सुशील पण त्याचे नियम म्हणजे नियम!!
रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आणि ढळढळीत उजेडात (रात्रीच्या 7.45/8 वाजता) 
आम्ही जेवून आमच्या हॉटेलला पोहोचलो. रूम ताब्यात मिळेतोवर अनेक 
जण जांभया देऊ लागले होते. आणि सामान रूम मध्ये काढून दुसर्‍या दिवशीचा 
6 वाजता चा गजर लावून मऊ लुसलुशीत गादीवर लंडनमध्ये अजून एक दिवस 
फिरायची स्वप्न बघत झोपेच्या कधी स्वाधीन झालो ते कळलच नाही... 
अभी तो लंडन में ठुमकना बाकी था! त्याबद्दल पुढच्या भागात बोलू.....
सौ प्रगती वल्लभ जोशी .

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

प्र चा प्रवास.....

 प्र चा प्रवास.....

युरोप ट्रीप भाग १ पूर्व तयारी 


"काय ग प्रगती, असीमची-(आमचे जोशी घराण्याचे कुलदीपक)10 वी झाली की तो काय करणार आहे?"
"सुट्टीत त्याला काहीतरी क्लास लावणार का?" "अग,परीक्षेनंतर त्याला गुंतव कुठल्यातरी शिबिरात 
नाहीतर ट्रेकला पाठवणार आहेस का?"
असे असंख्य प्रश्न जेवढ्या उत्सुकतेने सगळे विचारू लागले तेवढेच,नाही त्याही पेक्षा जास्त- एकदम 
वंदे भारत एक्सप्रेसच्या गतीने माझ्या डोक्यात, त्याच्या परीक्षेनंतर आम्ही तिघांनी युरोपला जायचे 
असा विचार रुंजी घालू लागला. आणि त्यानंतर घरात चालू झाली ती पटवा-पटवी... आणि अर्थातच 
माझ्या ह्या प्रयत्नांकडे वल्लभने (अस्मादिकांचे पती) पूर्णपणे दुर्लक्ष केले. आणि माझी अगदी दीनवाणी 
अवस्था झाली. तो स्पष्टपणे नाही म्हटला नाही आणि होकार ही दिला नाही. 
मनात म्हटलं जाऊ देत नाहीतरी युरोप एवढा खास नसेलच (कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात म्हणे 🤪! )
पैसे खर्च करताना फारसा विचार न करणारा वल्लभ प्रत्येक टूर कंपनीच्या प्रवासाचा कार्यक्रम (itenary) 
अभ्यासपूर्णपणे (स्वभावाला औषध नाही हेच खरे 🙄) खातरजमा करून घेऊ लागला. कुठली कंपनी किती 
डिस्काउंट देते आहे वैगरे लिहून काढून त्याचे एक्सेल शीट केले त्याने....आणि मला वाटले आता त्याची 
ह्या विषयावर डॉक्टरेट झाल्यावरच, म्हणजे, काही वर्षानी आता युरोपला जाता येईल...!!
पण कशी कोण जाणे, युरोप टूर प्रत्यक्षात आणलीही त्यानेच-वल्लभने. गिरीकंद ह्या टूर कंपनीत 
युरोप टूर बुक करून त्याने आम्हाला आश्चर्याचा  धक्का दिला होता. मग काय असीमच्या परीक्षेबरोबरच 
आम्हा तिघांच्या यु के आणि शेंगेन व्हिसाची गडबड चालू झाली....एका बाजूला त्यासाठी लागणारी कागदपत्रे 
जमा करणे, असीमचा अभ्यास, त्याची परीक्षेसाठीची तयारी, ट्रिपला लागणार्‍या गोष्टी ह्यांची एक सूची करणे 
अशी अनेक कामे एकत्रपणे चालू होती. अक्षय तृतीयेनंतर खऱ्या अर्थाने यूरोप ट्रिपच्या तयारीला सुरुवात झाली. 
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आपल्या सर्वांचेच युरोप टूर हे स्वप्नच असते.तिथली करेंसी,तिथली फॅशन,
तिथले वातावरण, तिथे रहाणारे भारतीय ह्याबाबत मनात उत्सुकता होती. 
त्यातच एवढा खर्च करून तिथे जाऊन कुठल्याही प्रकारची निराशा, विरस व्हायला नको असे राहून राहून 
मनात येत होते. माझ्या अनेक शंका कुशंकाना गिरीकंदच्या अनघा नखातेने अतिशय हसतमुखाने आणि 
महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वासाने उत्तरे दिली आणि मी निर्धास्तपणे पूर्ण तयारीला लागले. 
पंधरा मे ही तारीख युरोप टूरसाठी ठरलेली होती. 54 प्रवासी (आम्हा तिघांना धरून)या टूर साठी निश्चित 
झाले होते. पण काही जण (म्हणजे आमच्यासारखे) लंडनपासून टूरची सुरुवात करणार होते. आणि 
इतर फ्रांसमध्ये आम्हाला जॉईन करणार होते. 
दोन वेगवेगळ्या फ्लाइटने अबू धाबीमध्ये आम्ही 21 जण ह्या टूरचा श्री गणेशा लंडनपासून करणार होतो. 
यूके व्हिसा लगेचच मिळाला. शेंगेन व्हिसाबाबतीत सर्व अनिश्चित होतं. पेपरमधून देखील या व्हिसाबद्दल 
बातम्या येतच होत्या. त्यातच आमच्या ओळखीतल्या एकाच्या नातेवाइकांना हा व्हिसा नाकारला गेला 
आणि त्यांना टूर रद्द करावी लागली......
आता आमच्या टूर पुढे To be or not to be.... हा प्रश्न उभा राहिला, टूर जाईल का नाही या चिंतेत आम्ही होतो 
आणि त्यामुळे आम्ही,नातेवाईक किंवा मित्र या कोणालाही सांगितले देखील नव्हते.शेवटी सहा मेला शेंगेन 
व्हिसा हातात पडला आणि आम्ही कॉलर ताठ करत आमचा जीव भांड्यात पाडला. 
गिरीकंद ट्रॅव्हल्सबरोबर आमची ही पहिलीच टूर असल्यामुळे आम्हाला ग्रुप कसा असेल आणि मुख्य 
म्हणजे ग्रुप मॅनेजर कोण,कसा असेल ह्याची चिंता होती...ती श्रीदेव होलेला भेटून संपून गेली. 
त्याच दिवशी पेंडसे,साठे, कुलकर्णी,,मसलेकर कुटुंबिय आणि देशपांडे काकू ह्याची ओळख गिरीकंदच्या 
मीटिंगला झाली आणि आम्हाला सहप्रवासी छान मिळालेत  ह्याची जाणीव झाली...मनात हुश्श म्हटले. 
कारण सोळा सतरा दिवस बरोबर असणारे, आपल्यासारखेच सर्व गोष्टींचा आस्वाद घेणारे....
सगळ्यात रस घेणारे असतिल तर प्रवासाला अजूनच मजा येते. 
आता मात्र तयारीला भराभर सुरुवात झाली. बाहेरच्या वातावरणाचा आणि आमचाही पारा हळू हळू चढू 
लागला होता..!!
आणि अचानक आदल्या दिवशी गिरीकंद मधून विनायक वाकचौरे यांचा फोन आला की - 
खूप प्रयत्न करतोय,वाट बघतोय पण श्रीदेव होले यांचा शेंगेन व्हिसाच आलेला नाही.आणि आम्हाला लोकल 
ग्रुप मॅनेजर लंडनला भेटेल वैगेरेवैगेरे....मनात म्हटले अरे देवा....नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न... ...
टूर सुरू होण्याआधीच असा प्रसंग निर्माण झाल्यामुळे थोडी धाकधूक वाटू लागली. श्रीदेव असताना चिंता 
नव्हती पण त्याचा पासपोर्ट आला नव्हता त्यामुळे गिरीकंद ट्रॅव्हल्स मध्ये देखील आणीबाणी परिस्थिती 
निर्माण झालेलीअसावी. शेवटी विनायक वाकचौरे यांना दोन दिवसात शेंगेन कंट्रीज साठी तयार करण्यात आलं 
आणि श्रीदेव युकेपर्यंत आमच्यासोबत थांबणार असं ठरलं. 
केवळ प्रवाशांचा विचार करून दोन विमानांची तिकिटांचा भूर्दंड सोसून, गिरीकंद ट्रॅव्हल्सने प्रवाशांच्या 
मन:स्थितीला आणि मताला प्राधान्य दिलं हे जाणवले आणि परत निर्धास्त झालो. लंडन मग उर्वरित युरोप 
अशी ट्रीप असल्याने मुंबई-अबुधाबी फ्लाईटने आम्ही अबुधाबीला निघालो. वल्लभ नेहमीच 
कंपनीच्या कामांसाठी प्रवास करत असल्याने आम्ही चेक इन करत असताना त्याने पुढाकार घेतला. आम्हाला त्याने 
एका रांगेत थांबायला सांगितले. आमची रांग एकदम लहान असल्याने माझ्या मनात शंकेची 
पाल चुकचुकली (काय करणार माझ्याही स्वभावाला औषध नाहिये 😁) 
मी सारखी म्हणत होते की शेजारची रांग मोठी असून पुढे सरकते आहे.....शेवटी मीच न राहवून 
तिथल्या कर्मचार्‍याला विचारले तेव्हा कळले की ती रांग आमच्याच विमानाची होती 
पण वेब चेक इन केलेल्या लोकांची होती. अर्थातच आम्हाला त्या रांगेतून दुसर्‍या रांगेत जावे लागले.....
(आणि परिणामी वल्लभ आणि असीम ढाल घेऊन सज्ज झाले,कारण मी खूप वेळ सांगून 
त्यांनी ऐकले नसल्यामुळे मी कधीही शाब्दिक तलवार चालवीन असे त्यांनाअनुभवामुळे वाटले. असणार).
त्यात वल्लभने -" आम्हाला मधली सीट द्या " त्याला आईल (रांगेत शेवटी असलेली) अशी हवी होती... 
पण हवाई सुंदरीला काय वाटले कोणास ठाऊक तिने वेगवेगळया रांगांमधील मधल्या 
सीटचे वाटप आम्हाला करून....मला माझ्या तलवारीला धार करायला 
लावण्याची संधीच दिली. अर्थातच अबू धाबी पर्यन्त आम्ही तसाच प्रवास केला. 
अबू धाबीला उतरलो आणि चक्क ज़ोरदार थंडी वाजू लागली. इतक्या उष्ण प्रदेशात आलो असूनही
 तिथले विमानतळ मात्र खूपच थंड होते. आमच्यापैकी अनेकांनी आपले स्वेटर शाली टोप्या घातल्या....
तिथे आम्हाला आमच्या ग्रुपचे आधीच्या फ्लाइट ने आलेले सर्व जण भेटले. खरं म्हणजे त्यांच्या गप्पांच्या 
आवाजाने आम्हाला आमचे गेट तिथेच असणार हे कळले. (आपण मराठी माणसे जिथे जातो तिथे 
गप्पांचा फड रंगवू शकतो हेच खरे).इथे चांगला 6 तासांचा वेळ होता. त्यामुळे सगळ्यांचे खाणे पिणे, 
शॉपिंग आणि बाकीचे विधी ही उरकून झाले. आणि उरलेला वेळ घाटे काकांनी लावलेल्या सुरेख(आणि सुरेल) 
जुन्या हिन्दी गाणी ऐकत वेळ मस्त गेला. ( मला सुरुवातीला वाटल विमानतळावर ही गाणी लावली होती.....
म्हटले असतिल पॉप्युलर इथेही) 
अबुधाबी ते लंडन हा जवळजवळ साडेसात तासांचा प्रवास होता. त्यामुळे तिथल्या हवाई सुंदरीशी जाउन 
अस्मादिक बोलून आले. सीटचा घोळ निस्तरायला तिला विनंती केली आणि मला समुद्रातील किंवा 
हवाई प्रवासाने होणारा त्रास आहे हेही सांगितले.... 
तिला माझ्या बोलण्यातला सच्चेपणा कळला का माझ्या चेहर्‍याकडे बघून (ही पामर बिचारी खरेच पिचलेली 
दिसते असे वाटले असणार तिला) तिने आम्हाला म्हणजे मला आणि असीम ला आमची जागा बदलून दिली...
आणि वल्लभ ला त्याच्याच सीट वर बसायला लागले.....
सहन होईना आणि सांगता पण येईना अशी अवस्था झाली त्याची. आणि पहिल्या रांगेत जागा बसायला 
जागा मिळाल्यामुळे आम्ही मनातल्या मनात वयं जितम्(यदा कदाचित स्टाइल मध्ये) ह्या आवेशात पाय लांब करून सीट वर पहुडलो 
आणि साहेबांच्या देशाकडे झेप घेतली. हीथ्रो वर गेल्यागेल्या चहाची अशी तल्लफ आली होती की बस्स.... 
पण सगळ्यांना फ्रेश होता होता वेळ लागला. त्यामुळे सकाळी सकाळी थंड हवा असूनही चहा न घेता, 
साहेबांच्या देशात इमिग्रेशनसाठी लाईनमध्ये उभे राहिलो. तिथेच सूरपूरियां आणि गांधी काकूंची 
खाऊची बॅग रांगेत सारखी इकडे तिकडे फिरत होती (तिथल्याऑफिसरने बेवारस म्हणून ताब्यात घेण्या आधी 
ती गांधी काकूंनी घेतली म्हणून बरे झाले.... कारण ट्रिपचे पुढचे सर्व दिवस त्यातला खाऊचा खजाना आम्ही 
लुटत राहिलो) मला वाटत बॅगलाही कळले होते की पुढचे 15/16 दिवस त्यातला खाऊ असाच सगळ्यांकडे 
फिरणार होता!! 
भारतात इमिग्रेशनचे व्यवस्थापन खूपच चांगले आहे. त्या मनाने हीथ्रोवर त्यांना गर्दी सांभाळता येत नव्हती.
 (लोकसंख्येचा परिणाम असेल) तासाभरात इमिग्रेशन करून आम्ही एअरपोर्टवरच एकदम फ्रेश झालो. 
बर्‍याच जणांनी थंडीचे कपडे घातले होते....ताजेतवाने झाल्यावर एखाद-दोन फोटो काढल्यावर आम्ही 
श्रीदेवच्या बरोबर लंडन सिटी फिरण्यासाठी निघालो. आमचे सामान घेत, स्वतःचे इतरांचे फोटो काढत 
आम्ही भल्या मोठ्या गाडीत लहान मुलांच्या चेहर्‍यावर जशी पहिल्यांदा जत्रा पाहताना असते 
तश्या उत्सुकतेने बसलो... आमच्या ह्या साहेबाच्या देशाच्या सफरीबद्दल पुढच्या भागात बोलू.
आत्ता तर प्र च्या प्रवासाला सुरुवात झालीये....आगे आगे देखो होता है क्या?!!...

सौ प्रगती वल्लभ जोशी