हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

युरोप टूर - पॅरिस स्थलदर्शन-भाग 5 🇫🇷 पूर्णविराम भाग फ्रेंच गेट, वॉशरूम, आयफेल टॉवर 🗼, वियोग आणि पुनर्भेट

https://www.instagram.com/reel/CwDijw3prA7vOBLtq3SA9p9nHMgnNu4Y8LOhfk0/?igshid=MzRlODBiNWFlZA==

आज सकाळी फ्रेंच 🇫🇷 🏨  हॉटेल मध्ये मॅकरून स्कॅमबल एग ( इथले जगात भारी

 आणि क्रीमी होते म्हणे), Croissant चा 🥐 (ˈक्रोॅवसॉ - नाश्त्याच्या वेळी 

लोण्याबरोबर खाल्ला जाणारा वक्राकार पाव) स्वाद घेतल्यावर (खरे म्हणजे 

पोटात ढकलल्यावर..)आम्ही आज उर्वरित पॅरिस स्थलदर्शनाला बाहेर पडलो. 

फ्रेंच रस्त्यावरील आर्क दे ट्रायंफ(जिथे मोठे क्रांतिकारक आणि नेपोलियन 

युद्धांमध्ये फ्रान्ससाठी लढलेल्या, सर्व फ्रेंच विजयांची आणि मरण पावलेल्या 

सेनापतींची नावे, त्याच्या आतील आणि बाहेरील पृष्ठभागावर कोरून त्यांचा 

सन्मान केलेला आहे. तिथे असलेल्या तळघरातील,तिजोरीच्या खाली पहिल्या 

महायुद्धातील अज्ञात सैनिकांची कबर आहे असे म्हणतात. हे आर्क आणि 

आपल्या इंडिया गेटमध्ये बरेच साधर्म्य आहे. आपले इंडिया गेट अर्थातच 

त्यावरून 'प्रेरित' आहे)आणि कॅथेड्रल नोत्र देम दे पॅरिस, प्लेस दे ला 

कोॅनकोॅर् जे शाँज-एलिजे (Champs Elysee असे इंग्लिशमध्ये 

लिहितात पण उच्चाराचा ह्या स्पेलिंगशी काहीही संबंध नाही 😁)

ह्या पॅरिस, फ्रान्समधील एका अत्यंत प्रतिष्ठित रस्यावर आहे.


आर्क दि ट्रायम्फ समोर सम्पूर्ण ग्रुप 

आमची  उत्साही गर्ल्स गॅंग 



निरीक्षण डेक वरील दुर्बीण 


आयफेल च्या सर्वात वरच्या मजल्यावर 


सुपुत्र आणि पतिराजांबरोबर - अस्मादिक


अविस्मरणीय संध्याकाळ 



दमलेला सुपुत्र 



कॉफीच्या प्रतिक्षेत 



कॉफीच्या प्रतिक्षेत 



कुठूनही सुंदरच दिसतो . 

 जगातील सर्वांत प्रसिद्ध रस्त्यांपैकी एक असलेला शाँज-एलिजे 

युरोपातील सर्वांत महागडा भूखंड मानला जातो. २ किमी लांब व 

सरासरी ७० मीटर रुंद असलेला शाँज-एलिजे पॅरिसमधील सर्वांत 

लोकप्रिय पर्यटक आकर्षणांपैकी एक आहे.... इथे हवा इतकी सुरेख 

गार होती की निसर्गाची हाक सर्वांनाच ऐकू येऊ लागली....

आणि विनायक सर हे एकदम अनुभवी असल्याने त्यांनी बसमधून 

उतरत्या क्षणी गोल्डन वर्डस् उच्चारले..... इथे 🚻 वॉशरूम फ्री आहे...

बास...मग आम्ही सगळेच आधी त्या दिशेने गेलो. युरोपमध्ये मी मागेही 

म्हटल्याप्रमाणे ह्या 🚻 गोष्टीसाठी चांगलेच 

पैसे मोजावे लागतात. त्यामुळे ह्या फ्रीचा आनंद खूप होता. आणि

कदाचित त्यामुळेच इथे रांग होती. रांगेत उभ्या असताना हास्य 

विनोदानेच मला वाटत आमचा ग्रुप अजून जास्त बोलका होत होता. 

अश्या मार्गांना भेट देऊन आम्ही आर्क दे ट्रायंफ इथे आमच्या पूर्ण 

ग्रुपचा फोटो काढला(सांगितले ना शास्त्र असते ते). हवा चांगलीच

गार होती....त्यामुळे अनेकांनी स्वेटर्स, टोपी मफलर ह्यांच्या 

स्टाइल सकट फोटो घेतले. आर्क दे ट्रायंफ इथे एक ज्योत हौतात्म्य 

मिळालेल्या सैनिकांच्या प्रति प्रेम आणि आदर ह्यांचे प्रतिक म्हणून

 सतत जळत असते. तिला विझवण्याचा प्रयत्न करणार्‍या माणसांना 

झालेल्या शिक्षेबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका आहेतच...त्यातील 

काही मिनिने आम्हाला सांगितल्या. इथेही बरीच माहिती घेऊन 

आम्ही परत एकदा म्युझियमच्या इथे गेलो. काल आमचा इथला 

ग्रुप फोटो राहिला होता तो काढला. आणि त्यानंतर पेटपूजा करून

पॅरिसच्या सर्वात मोठ्या आकर्षणाच्या दिशेने निघालो. काल 

त्याचे लांबून दर्शन झालेच होते म्हणा...पण त्याचा सर्वात वरच्या

डेक वर आज आम्ही जाणार होतो. 🗼

आणि जसे तिथे पोहोचलो तसे ह्या टॉवरने सगळ्यांना भलतेच 

प्रभावित केले.(इथे जाताना आमच्यापैकी काही सहपर्यटकांना 

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर भेटले आणि त्यांनी

 त्याच्याबरोबर फोटो काढला. पणआमच्याबरोबर फोटो काढण्याचे 

भाग्य सिद्धार्थला न मिळण्याने तो थोडा नाराज झाला असेलच 😁🤪)

इथेही लागलीच आम्ही तिकिटांच्या रांगेत लागलो. रांगेत बहुतांशी 

लोक भारतीय होती ते बघून तितकेच हरखून गेलो....आणि त्यातही

 मराठी भाषिक होती. वेगवेगळया ट्रॅव्हल्स कंपनीबरोबर आलेल्या 

लोकांबरोबर लगेचच गप्पा चालू झाल्या. (अर्थात रांग एवढी मोठी 

होती की 2/3 तास तिथे उत्तम वेळ घालवण्यासाठी गप्पा हाच 

उत्कृष्ट पर्याय होता.) आणि रांगेमध्ये गोंधळ घुसा-घुशी फक्त 

भारतात होते ही कल्पना किती भ्रामक आहे ह्याचा प्रत्यय आला. 

आणि 3 तासांनंतर आम्हाला तिकिटे मिळून लिफ्टने जाण्यासाठी 

सोडण्यात आले. (सोडण्यात आले कसले आम्ही स्वतःला घुसवून

 घेतले 😅) इथल्या लिफ्ट हे एक वेगळे प्रकरण आहे. प्रत्येक 

मजल्यावर वेगळी लिफ्ट पकडायची,(कारण प्रत्येक मजल्याचे शुल्क 

वेगळे 🙄🫣) लिफ्टमध्ये चढणे मुंबईच्या लोकल प्रवासाची आठवण 

करून देत होते.....मध्ये उभे राहिले तरी आपोआपच पुढे जात होतो.

 पहिला मजला दुसरा मजला अशी मजल दरमजल करत आम्ही तिसर्‍या

 मजल्यावर पोहोचलो आणि तिथल्या डेकवर पायर्‍या चढत गेलो.....

इथल्या वातावरणाचे, इथून दिसणार्‍या पॅरिसच्या विहंगम अश्या 

दृश्याचे किंवा इथल्या हवेचे कुठल्याच गोष्टीचे वर्णन शब्दांच्या 

पलीकडले आहे..... रूमानी...गुलाबी....मोहक, उत्कट असे सगळे त्या

 वातावरणात भरून राहिलेले होते...कमालीची थंडी जाणवू लागली होती..

. इथल्या अनुभवाचे वर्णन... अविस्मरणीय एवढ्या एकाच शब्दात करू शकते. 

ह्या टॉवरबद्दल अश्या अनेक गोष्टी आहेत त्या त्याला उत्कृष्ट बनवतात. 

ह्याची रचना मोहक आणि कालातीत आहे, त्याच्या गुंतागुंतीच्या लोखंडी 

कामामुळे तो अतिशय आकर्षक दिसतो. 

आयफेल टॉवर गुस्ताव्ह आयफेल यांनी 1889 च्या एक्स्पोझिशन 

युनिव्हर्सेलसाठी बांधला होता, जो फ्रेंच राज्यक्रांतीच्या 100 व्या वर्धापन 

दिनानिमित्त होता. आयफेल टॉवरचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे 

22 महिने लागले. बांधताना कामगारांना किती उंचावर चढावे लागले ते 

पाहता, आश्चर्यकारक गोष्टअशी की टॉवरच्या बांधकामादरम्यान 

कोणतीही जीवित हानी झाली नाही किंवा कोणालाही दुखापत झाली नाही.

 हे ऐकून फ्रेंच इंजीनियर आणि काळजीपूर्वक काम करणार्‍या 

लोकांचे खूप कौतुक वाटले. आयफेल टॉवर पुडल लोखंडाचा बनलेला आहे

 आणि इथे एकूण तीन मजले आहेत, जे सर्व पर्यटकांसाठी खुले आहेत

(अर्थातच प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी वेगवेगळे शुल्क लागते हे आधी

 म्हटलेच आहे 🙄😏. तिसर्‍या मजल्यापर्यंत तिकीट काढल्यावर 

 पहिला दुसरा मजला त्याबरोबर फ्री 😁)

 पहिल्या दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यांवर रेस्टॉरंट्स आणि कॅफे

 आहेत, तर प्रत्येक स्तरावर पॅरिस शहराला उंचावरून पाहण्यासाठी 

एक निरीक्षण डेक आहे. 

गुस्ताव्ह आयफेलच्या महत्वाच्या सूचनेनुसार, हवामानाच्या 

क्षरणकारक प्रभावापासून लोहाचे संरक्षण करण्यासाठी, आयफेल 

टॉवरला दर 7 वर्षांनी संरक्षक रंगाच्या जाड थराने पुन्हा रंग दिला 

पाहिजे.(आम्ही गेलो तेव्हाही हे रंगकाम चालूच होते. 2024च्या 

ऑलिंपिकसाठी टॉवरची सजावट करण्यासाठी हे सगळे चालू होते असे 

मिनीने सांगितले. नंतर मला G 20च्या वेळी पुण्याचे सुशोभीकरण 

केले तेव्हा हेच सगळे आठवले)

सर्वात उंच मानवनिर्मित चमत्कार आणि जगातील सर्वाधिक भेट 

दिलेल्या साइट्सपैकी एक आहे हा आयफेल टॉवर!! आयफेल 

टॉवरशिवाय ह्या ‘प्रकाशाच्या शहराचा’-पॅरिसचा विचारच करता येत नाही. 

खाली आल्यावर सर्वांना कॉफी ☕️ ची चांगलीच तलफ आलेली होती. 

अर्थातच तिथल्या जवळच्या कॅफेमधून गिरीकंदतर्फे कॉफी मिळाली. 

सगळेच खूप दमलेले होते आणि तिथे बसायची सोय नव्हती.... 

त्यामुळे चक्क खाली फतकल मारून बसून कॉफीचा आस्वाद घेतला

( परदेशात आपल्याला कोणी ओळखत नाही ह्याचा असाही फायदा असतो.😁)

ह्या कॉफीची लज्जत भारी होती. इथे प्राचीशी गप्पा मारताना कळले

 की आयफेल रात्री दिव्यांच्या झगमगाटात खूप जास्त सुंदर दिसतो. 

पण युरोपमध्ये सूर्यास्त खूप उशिरा व्हायचा...पार 10 वाजेपर्यंत... 

मग हॉटेल पासून परत येथे स्वखर्चाने यायचे का ह्यावर आम्ही बरीच

 खलबते केली. (रात्री हॉटेल वर उशिरा पोहोचल्याने आणि दुसर्‍या

 दिवशी लवकर निघायचे असल्याने आम्ही गेलो नाही. पण उत्साही

 आणि हौशी प्राची मात्र गेली..आणि नयनरम्य दिव्यांचा झगमगाट 

असलेल्या टॉवरचा वीडियो ही सगळ्यांना दाखवला. तो बघितल्यावर

 आपण परत एकदा इथे रात्रीचा टॉवर बघायला यायचे असे मनोमन 

ठरवून टाकले. शेवटी माणसाचे मन कसे असते ना...कितीही मिळाले

 तरी ये दिल मांगे मोर म्हणतेच!!

तिथून 6 च्या दरम्यान आम्ही आमच्या गाडीच्या दिशेने निघालो. 

टॉवरच्या आजुबाजूला असलेल्या गार्डनमुळे गाडी बरीच लांब होती. 

आमच्या 55 जणांच्या ग्रुपपैकी फटांगरे आणि भदाणे कुटुंब हे 

सर्वात मोठे- 7 जणांचे होते (ज्यात दोन 4.5 वर्षाची जुळे भाऊ बहिण

 होते, 65 वर्षाचे रिटायर्ड पोलीस पाटील काका आणि त्यांची गुडघ्याच 

ऑपरेशन झालेली पत्नी होती आणि ह्याची मुलगी जावईही होते.

 भदाणे काका एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व होते. आणि संथपणाच

 त्यांना एकदम वावडं होत. ते आमच्या सगळ्यांपेक्षा आधी निघून भराभर 

पुढे आले. फटांगरे ह्यांना ते दिसेनात म्हणून ते त्यांना शोधायला पुढे गेले. 

त्यांच्या कुटुंबातील भदाणे काकू आणि सौ फटांगरे आणि जुळी मुले ही 

मागे चालत राहिली. भदाणे काकांना रस्त्यात शोधणे हे अवघड होते 

त्यामुळे सगळेच त्यांना बघू लागले. तर ते गाडीत जाऊन बसलेले होते.

 मागे राहिलेली चार जण मात्र आता दिसेनात. फटांगरेच्या सौ कडे 

इंटरनेशनल कॉलिंग चा फोन नसल्याने त्यांना contact करणे हे 

अवघड होते. दोनदा आम्ही आलो तो मार्ग बघून आल्यावर आम्ही

 सगळेच हवालदिल झालो होतो. फटांगरे हे ही काळजीत होते. 

तोवर त्यांच्या सौ नि कोणा अनोळखी माणसाला विनंती करून 

त्यांच्या फोन वरून कॉल केला आणि ते जवळच असल्याचे सांगितले.

 पॅरिससारखे गर्दीचे शहर, त्यात टॉवरसारखी अतिशय भरगच्च जागा

 ह्यात त्या चारही जणांना शोधणे हे एक मोठे आव्हानच होते. 

सौ फटांगरे ह्यांना फोनवर विचारल्यावर त्या आम्ही मुख्य रस्त्यावर 

आहोत असे म्हणाल्या...आणि आम्हीही मुख्य रस्त्यावरच होतो 🤔🤔

आता पंचाईत अशी होती की शोधायचे कुठे आणि कसे??!! 

इंटरनेट नसल्यामुळे लोकेशन शेयर करता येत नव्हते. पण वेळ

 हातातून निसटून चालला होता. फटांगरे ह्यांनी अनेक देश पाहिलेले आहेत

. जगभ्रमंती केलेली आहे. त्यामुळे त्यांनी विनायक आणि आम्हा 

सगळ्यांना तिथे वेळ न घालवता हॉटेलला पुढे जायला सांगितले

खूपच वेळ जात असल्यामुळे आम्ही जेवणाच्या हॉटेलकडे निघालो..

.आम्ही जरी पुढे जात असलो तरी गाडीत सगळेच हळहळत होते,काळजीत होते.....

आम्ही पुढच्या एका रस्त्यावर वळलो. वल्लभने त्याचा अंदाज बोलून 

दाखवला की ती चार जण त्याच रस्त्यावर असू शकतात...त्यामुळे 

मागे बसलेले,(आणि महत्वाचे म्हणजे सजग असलेले) मसलेकर बाहेर

 बघू लागले. अर्थातच सगळे मुलांच्या आणि भदाणे काकूंच्याबद्दल

 काळजीने बोलत होती... दोन्ही अतिशय गोड निरागस मुले....

पायाचे ऑपरेशन झालेल्या काकू आणि सौ फटांगरे.....सगळ्यांचेच 

चेहरे डोळ्यांसमोर येत होते....तेवढय़ात सौ मसलेकर जोरात चित्कारल्या...

.. ती बघा मुले.....विनायक ने लगेच बस थांबवली.....भराभर पळत रस्ता

 क्रॉस करून त्याच्या जवळ पोहोचले....फटांगरे त्याच्याबरोबरच होते....

त्यामुळे विनायक ने मुलीला,फटांगरे ह्यांनी मुलाला आणि त्याच्या 

सौ नि आईला घेऊन आमची बस गाठली. आणि त्या सर्वाचे स्वागत 

टाळ्या शिट्या आणि जल्लोषात झाले. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. 

मसलेकर जिन्होंने ये मसले का समाधान ढूंढने में बहुत बड़ा योगदान दिया....

.त्यांच्यासाठीही आम्ही सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या...

.त्यांचे लक्ष योग्य वेळी बाहेर गेले त्यामुळे आमचे छोटे सहप्रवासी 

आमच्याबरोबर जेवायला येऊ शकले. इतक्या उंच टॉवरवर गेलो होतो....

अगदी टॉप ऑफ द वर्ल्ड होतो....आणि कोणी 'आपले'  ह्या परदेशात 

हरवले आहे ह्या जाणीवने एकदम जमीनीवर आलो होतो ...

ह्या अनुभवामुळे पुढच्या संपूर्ण ट्रीपभर भदाणे काका आणि गोंडस 

मुले ह्यांच्यावर सगळ्यांनीच लक्ष ठेवले आणि काळजी घेतली हे वेगळे सांगायला नको!! 

आताच्या गूगलच्या जमान्यात काहीही शोधणे आणि ते क्षणार्धात  सापडणे 

खूप सोपे वाटते....पण अशी आतून वाटलेली काळजी, वियोगाने 

दाटलेली कासावीशी, मायेने दिलेली आश्वस्त पाठीवरची थाप, निःस्वार्थपणे 

केलेली मदत,छोट्या मुलांच्या काळजीने टचकन भरलेले डोळे,

 आपण ज्यांची वाट पाहिली ते सापडल्यावर पडलेल्या हर्षोत्फूल्लित टाळ्या,

 आणि भेटीनंतरचे प्रेमाचे ओले लोलक ह्या गोष्टी गूगलवरही सापडणार नाहीत....

पण आमच्या हातात त्या अगदी अलवारतेने पडल्या.....

आम्हाला हे सगळे अगदी अनाहतपणे गवसले....

ह्यापेक्षा सुख म्हणजे दुसरे काय असते??!!

 आणि काय पुण्य  असल की ते असे मिळते??!! ... 



मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

जलपर्यटन, रोमांस, फ्रेंच उच्चार, अंतर्मुख करणारी नाती..!!पॅरिस स्थलदर्शन-भाग 4 उत्तरार्ध

https://www.instagram.com/reel/CwDijw3prA7/?igshid=MzRlODBiNWFlZA==

पॅरिस स्थलदर्शन-भाग 4 उत्तरार्ध
लुव्रच्या माहितीपूर्ण भेटीनंतर, भरपेट दुपारचे जेवण करून,संध्याकाळच्या
 उंबरठ्यावर,आम्ही सीन नदीच्या किनार्‍यावर बोटीच्या सफरीला 
(जलपर्यटनाला) गेलो. पॅरिसमध्ये आम्हाला जोडले गेलेले नवीन 
प्रवासी,थोडे पेंगुळलेल्या अवस्थेत होते. पण बोटीतून आयफेल टॉवर 
पण दिसतो हे ऐकल्यावर सगळेच थोडे उत्साहित झाले.
पॅरिस शहरातील सर्वात प्रसिद्ध सिन  ही नदी फ्रान्समधून वाहणारी 
प्रमुख नदी आहे.(सेन असाही उच्चार आहे,पण मराठीत तिला 
सिन असेही म्हणतात म्हणे... बरोबर काय हे फ्रेंच लोक आणि ती 
सरिताच जाणे 🤪)..पॅरिस शहर ह्या नदीच्या काठी वसलेले आहे.
तर जेवणानंतर आम्ही तिच्या तिरावर पोहोचलो.  आणि प्रथम 
दर्शनी ती मला मुळा-मुठेची 🏞मोठ्ठी बहिण वाटली (फक्त जरा अंगाने 
भरलेली, संसारात स्थिरस्थावर झालेली होती इतकेच)!!
सिनच्या किनार्‍याने जगभरातली लोकांना,विशेषतः प्रेमींना 
शतकानुशतके मंत्रमुग्ध केले आहे आणि रोमँटिक 💒फेरफटका
 मारण्यासाठी हा किनारा अगदी सर्वोत्तम ठिकाण आहे असे खूप 
ठिकाणी मी वाचलेले होते.
बोटीमध्ये जाण्यासाठी तोबा गर्दी होती.बरेचसे आमच्यासारखे पर्यटक 
होते...आणि अर्थातच इथेही भल्या मोठ्या रांगेत उभे राहावे लागणार 
होते.आम्ही आता रांग लावायला चांगलेच सरावलेले होतो.(रांगेत 
घुसणारे काही युरोपियन होते..पण पुण्याची लोक रांगा भेदून पुढे 
जाण्यात एकदम अभिमन्यु असतात हे आता त्यांनाही कळले असेल.)
एकदम एखाद्या एक्सपर्टसारखा-आमचा पूर्ण ग्रुप रांगेत उभा राहिला.
सर्वजण बोटीत चढल्यावर कुठे बसायचे आणि आपल्या ग्रुपच्या 
बाकीच्या मेंबर्ससाठी कुठे रुमाल टाकून ठेवायचा ह्याचे डिस्कशन 
चालू होते.(ही आपली-म्हणजे भारतीय लोकांची स्पेशालिटी आहे,
असे फक्त आपल्यालाच वाटते. पण लाल डब्यात खिडकीतून 
रुमाल टाकून आपल्या इथे जागा पकडतात तसे तिथे स्कार्फ,
टोप्या किंवा स्टोल टाकून इतकच...थोडक्यात काय...इथून 
तिथून सगळे मानव, जागेसाठी-खुर्चीसाठी🪑 सारखेच हपापलेले)
बोट आल्यावर आम्ही,अर्थातच वरच्या डेक वर गेलो आणि ज्यांना 
बोट लागते ते खाली बसले.
वरून खूपच सुंदर दिसतं असे ऐकले होते.वर गेल्यावर कुलकर्णी काका, 
ज्योती काकू आणि प्राची आमच्या जवळच बसलेले होते.
ट्रीपमध्ये समवयस्क लोकांशी आपले जमतेच पण आपल्या इतकेच
 उत्साही, गप्पिष्ट आणि हौशी लोक आपल्या सोबत असतिल तर 
आनंदी ट्रीप अविस्मरणीय ही होते. कुलकर्णी,पेंडसे, साठे, महाजन,
 डहाळे,देशपांडे,घाटे ह्या सर्व कुटुंबीयांमुळे 📸 फोटो काढणे,
आजुबाजूला दिसणार्‍या गोष्टीवर, स्थळांबद्दल माहिती देणे घेणे 
आणि कधीतरी...काही वैयक्तिक आठवणी शेअर करणे ह्यामुळे 
खरे तर ह्या सगळ्यांमुळे आमच्याबरोबर आमचा ट्रिपचा आनंद 
द्विगुणित होत होता एवढे नक्की!!
आता संध्याकाळचे 5.30  वाजत आले होते आणि टकटकीत सूर्य 🌞 
आमच्याकडे चांगलेच लक्ष ठेवून होता.
जशी राइड चालू झाली तस-तशी इंग्रजीमध्ये, आजुबाजूला 
दिसणार्‍या पॅरिसबद्दल,तिथल्या स्थळांबद्दल माहिती कानावर
 पडू लागली. नेपोलियन,  ओर्लेयों (ह्यांचे उच्चार भलतेच असतात
 ह्याचे इंग्रजी मध्ये Orleans असे लिहितात...एकंदरीत फ्रेंच
 भाषेत बोलण्यासाठी जीभ वळत नव्हती एवढे खरे)  
जोन ऑफ आर्क (शाळेत शिकवलेला तिचा धडा), 
टेल ऑफ टू सिटीझ् ह्या सगळ्यांबद्दल कुठे कुठे वाचलेले 
आणि वर्णन केलेले फ्रांस, तिथले कोर्ट,नॅशनल असेंब्ली, 
इनव्हॅलाइड्स, म्युसी डी'ओर्से आणि नोट्रे डेम डी पॅरिस यासारख्या 
शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणच्या खुणा आम्ही ह्या 
राइडमध्ये बघू शकलो,अर्थातच लांबून.!
मला मात्र मजा वाटत होती त्या नदीवर असलेल्या अनेक 
पुलांच्या खालून जाताना.!! एक तर त्या पुलांच्या कमानीवर 
अनेक अनोळखी लोक, उभे राहून, बोटीतून जाणाऱ्या प्रवाश्यांना 
हात हलवून,हसत बाय करायचे...काय नात होतं त्यांच आमच्याशी??!! 
काहीच नाही..पण ज्या प्रसन्नतेने सस्मित ते हात हलवत ते
 पाहून हळू-हळू आम्हा सगळ्यांचेच हात हलू लागत आनंद 
ही संसर्गजन्य असतो...जणू ती प्रसन्नता आम्हाला जोडत होती. 
आणि दुसरे म्हणजे सर्वच पुलांच्या कमानीवर दोन्ही बाजूला 
विविध योद्धांची सोनेरी शिल्प होती. अतिशय बारकाईने केलेले 
शिल्पकामाला सोनेरी झळाळी मिळत होती...संध्याकाळच्या
 प्रकाशात ती अप्रतिम, चमकदार अशी दिसत होती. 
आणि बघता बघता आम्हाला तो दिसू लागला... आणि 
क्षणोक्षणी तो जवळ येऊ लागला.... त्याचे बिंब पाठीशी दिसेल
 असे फोटो काढण्यासाठी स्पर्धा चालू झाली आणि तो म्हणजे
 पॅरिस शहराचा सर्वात मोठा आकर्षित करणारा आयफेल टॉवर!!
मग आम्हीही त्याला पाठीशी ठेवून फोटो काढले(शेवटी शास्त्र असते ना ते😁😎)
पॅरिससारख्या धावपळीच्या,गर्दी असलेल्या शहराच्या 
किनार्‍याची ही शांततापूर्ण आणि तरीही तेव्हढीच रोमांचकारी
आणि प्रसन्न दृश्ये देणार्‍या ह्या सिन नदीच्या ह्या क्रूझचे, 
तिथल्या हवेचे, वातावरणाचे वर्णन कसे करणार?? 
मला राहून राहून अपूर्वाई आणि पु.ल.आठवत राहिले.
किनार्‍यांवर बरीच कुटुंबे आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवत 
होते...काही ठिकाणी वाइन 🍷 चे घुटके घेत, तर काही ठिकाणी 
चक्क एकमेकांबरोबर नाचत-गात आनंद साजरा करत होते....
खरे म्हणजे ते जगणे साजरे करत होते...आपल्या-हम आपके 
है कौन सारखे एकत्र येऊन,गाणी म्हणत, गप्पा मारत सुख 
दुःखाच्या गोष्टी करत वेळ घालवणारी ही लोक पाहून, 
मला वाटले, खरच...पोट कसेही भरता येते पण काळीज 
भरायला...आपली काळजी करणारे...नव्हे, 
आपली काळजी घेणारे आपले लोक आपल्याला लागतातच नाही??!!
कुठल्याही शब्दांचा खरा अर्थ शब्दकोशात सापडतच नाही 
तिथे सापडतात ते प्रतिशब्द....शब्दांचा खरा अर्थ जीवनातच सापडतो
... अनुभवात सापडतो....हे पु. ल. म्हणतात ते काही खोटे नाही...
ह्या प्रवासात खूप मजा आली... नेहमीप्रमाणे विनोद झाले, 
गाणी पण म्हटली पण ह्या प्रवासात अंतर्मुख व्हायला झाले होते...

इथून झाली आमच्या सिन सफरी ला सुरुवात 

क्रुझ चे तिकीट 

उत्तम रंगसंगती असलेली शिल्पकला 

गप्पा मारत किनाऱ्या वॉर विसावलेले फ्रेंच लोक 

नित्याचीच फोटो काढायची झुंबड 

किनाऱ्यावर उत्साहात चाललेले गाणे आणि नृत्य 

 किनाऱ्यावरील पुलाच्या खांबावरील शिल्पे !

एका पुलाची सुशोभित केलेली कमान 

हाच तो आयफेल टॉवर ..!

त्याचे सर्व अँगलने फोटो काढण्यात सगळे गर्क 

सोनेरी झळाळी 

वरच्या डेक वरचा बोटीचा फक्त अर्धा भाग 

अस्मादिक आणि सुपुत्र 

असाच कॅन्डीड काय म्हणतात तसा 



झिम्मा मध्ये म्हंटले आहे तसे....प्रवासात माणूस जुन्याचा 
नवीन होतो....आमच्यातल्या ह्या नावीन्याचे स्वागत करत होतो. 
आम्ही त्याच सिनेमातील 🎥 गाण्यासारखे....
हसर्‍या वाटा घेऊन सोबती.... आजची सफर मनात साठवताना...
उद्याची स्वप्ने बघत बघत आम्ही हॉटेलकडे निघालो.