हा ब्लॉग शोधा

बुधवार, १८ ऑक्टोबर, २०२३

पॅरिस, लूव्र, मोनालिसा -यूरोप टूर भाग 4 मध्य भाग

https://www.instagram.com/reel/CwDijw3prA7/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== यूरोप टूर भाग 4 मध्य भाग 

पॅरिस, लूव्र, मोनालिसा

पॅरिस....ज्याला सिटी ऑफ लव,फॅशन अँड लाइट म्हणतात!! आम्ही इथल्या जगप्रसिद्ध 
लूव्र म्युझिअमला (मोनालिसा जिथे स्मितहास्य देत बसली आहे ती जागा हो) भेट देउन 
स्थलदर्शनाला सुरुवात करणार होतो. 
लूव्र जगातील सर्वात मोठ्या व सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या संग्रहालयांपैकी एक मानले जाते. 
१० ऑगस्ट १७९३ साली सुरू झालेल्या ह्या लूव्रला दरवर्षी सुमारे ८० लाख पर्यटक भेट
 देतात म्हणे. (आम्हीही त्यातलेच एक)
पॅरिसमध्ये वेगवेगळया रस्त्यावरून जाताना तिथली फॅशन, तिथला आब (ऐब) पदोपदी जाणवत होता. 
जुन्या इंग्लिश पिक्चर्समुळे तिथल्या फैशनेबल बायकांची प्रतिमा माझ्या मनात होती... 
टेल ऑफ टू सिटीझ ह्या डिकेन्सच्या पुस्तकातल्या फ्रेंच पुरुष आणि स्त्रियांचे वर्णन ही 
डोक्यात होतेच...त्यामुळे त्या वर्णनाची तुलना माझ्या मनात पदोपदी होत होती. 
आम्हाला गाडीने एका ठिकाणी सोडले आणि तिथून आम्ही (नेहमीप्रमाणे) चालत लूव्रच्या 
दिशेने गेलो. छोटा दरवाजा पार केल्यावर आम्ही जस-जसे पुढे आलो तस-तसे आम्हाला 
इथली प्रसिद्ध पिरामिडच्या आकाराची काचेची रचना दिसू लागली.आणि तिथेच आम्हाला,
फ्रांसमध्ये अनेक वर्ष राहणारी भारतीय वंशाची-मिनी शर्मा (एकदम स्टाइलिश) ही
 गाइड भेटली. तिने मोजक्या शब्दात म्युझिअमबद्दलची माहिती दिली आणि तिथे 
गेल्यानंतर कुठल्या गॅलरीला भेट द्यायची वैगरे माहिती सांगितली.आम्ही सर्व तिच्या 
बरहुकूम आत निघालो. 
लूव्रमध्ये आत शिरताच सगळे चेकिंग झाल्यावर आम्ही सर्वानी कानात हेड फोन घातले 
ज्यात तिथल्या प्रत्येक दालनांची, तिथे प्रदर्शित केलेल्या पेंटिंग, शिल्पांची इंग्रजीमध्ये 
ध्वनीमुद्रित केलेली माहिती ऐकू येत होती. इथे अंदाजे 21दालने आहेत म्हणे....
आमच्यापैकी सर्वांना मोनालिसाचे फारच आकर्षण होते (फ्रांसमध्ये मोनालिसा
आणि आयफेलला भेट देणे म्हणजे भाडीपाच्या भाषेत शास्त्र असते ते 😎) 
आणि लूव्रवाल्यांना आपल्याकडे जास्तीत जास्त पर्यटक तिलाच बघायला येतात 
हे चांगलेच माहित आहे. कारण पाहिल्या दालनापासून तिचा फोटो आणि तिला
 कुठल्या दालनात ठेवली आहे ह्याचे दिशादर्शक जागोजागी होते. (मला छोटीसी 
बात नावाच्या पिक्चरची आणि अमोल पालेकर अशोककुमार ह्यांना शोधत 
जाताना जसे बाण दाखवले आहेत त्याची आठवण येऊन गेली) आम्हाला मिनी 
आणि विनायक दोघांनीही एक कानमंत्र सांगितला होता की इथे सगळेच 
पाहण्यासारखे आहे...पण मोनालिसा पहायची असेल तर बाकी कुठेही न रमता 
तिच्या दालनात लवकर पोहोचा .... मग काय सगळेच लगोलग त्या म्युझियमच्या 
भूलभुलैयामध्ये बुडून गेलो.... कोलंबसने भारत शोधायला केली नसेल इतकी 
धडपड आमची चालू झाली...मोनालिसाला बघायला !!
तिथल्या सर्व कलाकृतींची माहीती आम्हाला ध्वनिमुद्रित ऐकू येतच होती
 (खरे तर तो वॉकमन सदृश प्रकार सांभाळणे, आणि त्यातले ऐकलेले समजून 
बघणे,ह्याला मला वाटतं वर्ष जातील..त्याचा उपयोग कमी आणि त्रासच जास्त 
होत होता!! मी तर पहिल्या10 मिनिटात काढून ठेवला. नंतर कळले 90% 
टुरिस्ट त्याला काढून ठेवतात....म्हंटले चला आपण परदेशी जाउन अपवादात्मक 
काम केले नाही)... ध्वनीमुद्रित माहितीनुसार म्हणे इथल्या काही कलाकृती 
शतकानुशतके टिकून आहेत आणि त्यांनी इतिहासावर असा ठसा उमटवला 
आहे की त्यांच्याशिवाय जगाची आपण कल्पनाही करू शकत नाही. 🙄 
त्यांच्या प्रभावामुळे आजपर्यंत अनेक तज्ञांनी त्यांचे कौतुक केले आहे. 
या महान कलाकृतींचा अनुभव घेण्यासाठी लूव्र ही सर्वोत्कृष्ट जागा आहे.
हा राजवाडा म्हणजे जगातील सर्वात प्रतिष्ठित कलेचे नमुने - चित्रे, शिल्पे, 
स्थापत्य घटक आणि अनेक भिन्न उत्पत्ती आणि कालखंडातील (खरे म्हणजे 
युगातील..) खूप प्रसिद्ध किंवा अगदी निनावी कलाकारांच्या सुद्धा कला वस्तूंचे 
घर आहे. आणि कोणत्याही दोन उत्कृष्ट कृती एकसारख्या नाहीत हे इथले वैशिष्टय़ आहे! 
अलिबाबाला गुहेत शिरल्यावर जसे वाटले असेल तसे मला वाटले....अनेक 
आखीवरेखीव शिल्प, वेगवेगळया मीडियम वापरुन काढलेली अप्रतिम चित्रे 
अश्या एक न अनेक वैविध्यपूर्ण कलाकृती बघताना हरखून जायला होत होते
( मला ह्या कलांमधील काहीही कळत नसताना जर माझी ही अवस्था होती 
तर कला शिकणार्‍या विद्यार्थ्यांंना किती शिकायला मिळत असेल)...पण 
सर्वांच्या मनात मोनालिसाचा ध्यास होता ... जिथे तिथे तिच्या फोटो सकट 
बाण दाखवले होते...आम्ही मिशन मोनालिसा म्हणत तिच्या दिशेने मार्गक्रमण
 करत होतो. आणि शेवटी आम्ही तिच्या दालनात शिरलो. एका भव्य दालनात 
अगदी एका मोठया भिंतीवर ती दिसली...हलके स्मितहास्य (असे तिच्या 
एक्सप्रेशनचे वर्णन करतात म्हणून....नाहीतर तिच्या चेहर्‍यावर *एखादी ही 
स्मित रेषा* मला तरी दिसली नाही) देत बघत होती...
तिला जवळून बघायला किंवा तिचे फोटो घ्यायला रांग होती...तिच्या समोर 
गेल्यावर वाटले....ह्याच साठी केला होता अट्टाहास हा?? 4 किंवा 16 वर्ष
 लियोनार्दो दा विंन्सी हे चित्र काढत होता अश्या काही आख्यायिका आहेत. 
कुठूनही पाहिले तरी ती आपल्याकडेच पहाते आहे असे (3D चित्र)वाटते. 
तिला पाहिल्यावर आम्ही परत आमच्या संकेतस्थळावर पोहोचलो. 
लूव्र मधील अनेक उत्कृष्ट कलाकृतींमधील एक !

लांबवर दिसते आहे ती मोनालिसा आणि तिची एक झलक पाहण्यासाठी उसळलेली गर्दी !!😄

सर्व दालनांकडे पोहोचणारे आतील मार्ग आणि त्यावर सुरेख चाप (Arc)

पिरॅमिड सदृश्य रचनेच्याबी आतून दिसणारे दृश्य आणि गिरिकंद चा झेंडा भेटकलेल्या प्रवासीयांच्या प्रतिक्षेत !

लूव्र ची ओळख बनलेले पिरॅमिड सदृश्य रचना (आपल्या१०
वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये हि हा फोटो आहे)


मोनालिसाला कुठल्या दालनात ठेवली आहे ह्याचे दिशादर्शक 



भव्य दिव्य असे आतील मार्ग जिथे रंगसंगती आणि स्थापत्य ह्यांचा उत्तम नमुना आहे 

हिच्याच साठी केला होता अट्टाहास हा ??!! लिओनार्दो दा विंची ची जगप्रसिद्ध - मोनालिसा !!😆😉

तोवर लक्षात आले की आमच्यापैकी काही जण त्या मायाजालात कुठेतरी भटकले आहेत.
 त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वांनाच तिथे रेंगाळायला लागले. मग काय फ्री असलेल्या
( युरोप मध्ये त्यासाठी बर्‍याच ठिकाणी 1/2 डॉलर म्हणजेच 85 ते 170 रुपये खर्च
 करावे लागतात) स्वच्छता गृहाला भेट देऊन झाली तरी मंडळी सापडेनात त्यामुळे
 दमलेल्या आमच्यासारख्यांनी स्वतः खर्च 
(आपल्या चलनामध्ये प्रचंड महाग वाटतो )करून कॉफी पिता पिता सोबतीला भरपूर
 ( फुकटच्या) गप्पा मारल्या आणि इथेही आमच्या हसण्याचा झेंडा रोवला. 
आजुबाजुला आलेल्या कॉलेज मधल्या मुलामुलींच्या ग्रुपने आम्हा लोकांकडे वळून
 दोन चारदा पाहिलेही (त्यांना आम्ही दंगा करण्यात त्यांची तगडी काॅम्पिटिशन
 वाटलो असू कदाचित)
निवांत परत आलेल्या मंडळीना घेऊन (मनातल्या मनात अर्थातच पुढल्या वेळी ह्यांना
 लवकर हलवले पाहिजे असा विचार करत)आम्ही पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो.