प्र चा प्रवास.....
युरोप ट्रीप भाग १ पूर्व तयारी
"काय ग प्रगती, असीमची-(आमचे जोशी घराण्याचे कुलदीपक)10 वी झाली की तो काय करणार आहे?"
"सुट्टीत त्याला काहीतरी क्लास लावणार का?" "अग,परीक्षेनंतर त्याला गुंतव कुठल्यातरी शिबिरात
नाहीतर ट्रेकला पाठवणार आहेस का?"
असे असंख्य प्रश्न जेवढ्या उत्सुकतेने सगळे विचारू लागले तेवढेच,नाही त्याही पेक्षा जास्त- एकदम
वंदे भारत एक्सप्रेसच्या गतीने माझ्या डोक्यात, त्याच्या परीक्षेनंतर आम्ही तिघांनी युरोपला जायचे
असा विचार रुंजी घालू लागला. आणि त्यानंतर घरात चालू झाली ती पटवा-पटवी... आणि अर्थातच
माझ्या ह्या प्रयत्नांकडे वल्लभने (अस्मादिकांचे पती) पूर्णपणे दुर्लक्ष केले. आणि माझी अगदी दीनवाणी
अवस्था झाली. तो स्पष्टपणे नाही म्हटला नाही आणि होकार ही दिला नाही.
मनात म्हटलं जाऊ देत नाहीतरी युरोप एवढा खास नसेलच (कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात म्हणे
! )
! )पैसे खर्च करताना फारसा विचार न करणारा वल्लभ प्रत्येक टूर कंपनीच्या प्रवासाचा कार्यक्रम (itenary)
अभ्यासपूर्णपणे (स्वभावाला औषध नाही हेच खरे
) खातरजमा करून घेऊ लागला. कुठली कंपनी किती
) खातरजमा करून घेऊ लागला. कुठली कंपनी किती डिस्काउंट देते आहे वैगरे लिहून काढून त्याचे एक्सेल शीट केले त्याने....आणि मला वाटले आता त्याची
ह्या विषयावर डॉक्टरेट झाल्यावरच, म्हणजे, काही वर्षानी आता युरोपला जाता येईल...!!
पण कशी कोण जाणे, युरोप टूर प्रत्यक्षात आणलीही त्यानेच-वल्लभने. गिरीकंद ह्या टूर कंपनीत
युरोप टूर बुक करून त्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला होता. मग काय असीमच्या परीक्षेबरोबरच
आम्हा तिघांच्या यु के आणि शेंगेन व्हिसाची गडबड चालू झाली....एका बाजूला त्यासाठी लागणारी कागदपत्रे
जमा करणे, असीमचा अभ्यास, त्याची परीक्षेसाठीची तयारी, ट्रिपला लागणार्या गोष्टी ह्यांची एक सूची करणे
अशी अनेक कामे एकत्रपणे चालू होती. अक्षय तृतीयेनंतर खऱ्या अर्थाने यूरोप ट्रिपच्या तयारीला सुरुवात झाली.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आपल्या सर्वांचेच युरोप टूर हे स्वप्नच असते.तिथली करेंसी,तिथली फॅशन,
तिथले वातावरण, तिथे रहाणारे भारतीय ह्याबाबत मनात उत्सुकता होती.
त्यातच एवढा खर्च करून तिथे जाऊन कुठल्याही प्रकारची निराशा, विरस व्हायला नको असे राहून राहून
मनात येत होते. माझ्या अनेक शंका कुशंकाना गिरीकंदच्या अनघा नखातेने अतिशय हसतमुखाने आणि
महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वासाने उत्तरे दिली आणि मी निर्धास्तपणे पूर्ण तयारीला लागले.
पंधरा मे ही तारीख युरोप टूरसाठी ठरलेली होती. 54 प्रवासी (आम्हा तिघांना धरून)या टूर साठी निश्चित
झाले होते. पण काही जण (म्हणजे आमच्यासारखे) लंडनपासून टूरची सुरुवात करणार होते. आणि
इतर फ्रांसमध्ये आम्हाला जॉईन करणार होते.
दोन वेगवेगळ्या फ्लाइटने अबू धाबीमध्ये आम्ही 21 जण ह्या टूरचा श्री गणेशा लंडनपासून करणार होतो.
यूके व्हिसा लगेचच मिळाला. शेंगेन व्हिसाबाबतीत सर्व अनिश्चित होतं. पेपरमधून देखील या व्हिसाबद्दल
बातम्या येतच होत्या. त्यातच आमच्या ओळखीतल्या एकाच्या नातेवाइकांना हा व्हिसा नाकारला गेला
आणि त्यांना टूर रद्द करावी लागली......
आता आमच्या टूर पुढे To be or not to be.... हा प्रश्न उभा राहिला, टूर जाईल का नाही या चिंतेत आम्ही होतो
आणि त्यामुळे आम्ही,नातेवाईक किंवा मित्र या कोणालाही सांगितले देखील नव्हते.शेवटी सहा मेला शेंगेन
व्हिसा हातात पडला आणि आम्ही कॉलर ताठ करत आमचा जीव भांड्यात पाडला.
गिरीकंद ट्रॅव्हल्सबरोबर आमची ही पहिलीच टूर असल्यामुळे आम्हाला ग्रुप कसा असेल आणि मुख्य
म्हणजे ग्रुप मॅनेजर कोण,कसा असेल ह्याची चिंता होती...ती श्रीदेव होलेला भेटून संपून गेली.
त्याच दिवशी पेंडसे,साठे, कुलकर्णी,,मसलेकर कुटुंबिय आणि देशपांडे काकू ह्याची ओळख गिरीकंदच्या
मीटिंगला झाली आणि आम्हाला सहप्रवासी छान मिळालेत ह्याची जाणीव झाली...मनात हुश्श म्हटले.
कारण सोळा सतरा दिवस बरोबर असणारे, आपल्यासारखेच सर्व गोष्टींचा आस्वाद घेणारे....
सगळ्यात रस घेणारे असतिल तर प्रवासाला अजूनच मजा येते.
आता मात्र तयारीला भराभर सुरुवात झाली. बाहेरच्या वातावरणाचा आणि आमचाही पारा हळू हळू चढू
लागला होता..!!
आणि अचानक आदल्या दिवशी गिरीकंद मधून विनायक वाकचौरे यांचा फोन आला की -
खूप प्रयत्न करतोय,वाट बघतोय पण श्रीदेव होले यांचा शेंगेन व्हिसाच आलेला नाही.आणि आम्हाला लोकल
ग्रुप मॅनेजर लंडनला भेटेल वैगेरेवैगेरे....मनात म्हटले अरे देवा....नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न... ...
टूर सुरू होण्याआधीच असा प्रसंग निर्माण झाल्यामुळे थोडी धाकधूक वाटू लागली. श्रीदेव असताना चिंता
नव्हती पण त्याचा पासपोर्ट आला नव्हता त्यामुळे गिरीकंद ट्रॅव्हल्स मध्ये देखील आणीबाणी परिस्थिती
निर्माण झालेलीअसावी. शेवटी विनायक वाकचौरे यांना दोन दिवसात शेंगेन कंट्रीज साठी तयार करण्यात आलं
आणि श्रीदेव युकेपर्यंत आमच्यासोबत थांबणार असं ठरलं.
केवळ प्रवाशांचा विचार करून दोन विमानांची तिकिटांचा भूर्दंड सोसून, गिरीकंद ट्रॅव्हल्सने प्रवाशांच्या
मन:स्थितीला आणि मताला प्राधान्य दिलं हे जाणवले आणि परत निर्धास्त झालो. लंडन मग उर्वरित युरोप
अशी ट्रीप असल्याने मुंबई-अबुधाबी फ्लाईटने आम्ही अबुधाबीला निघालो. वल्लभ नेहमीच
कंपनीच्या कामांसाठी प्रवास करत असल्याने आम्ही चेक इन करत असताना त्याने पुढाकार घेतला. आम्हाला त्याने
एका रांगेत थांबायला सांगितले. आमची रांग एकदम लहान असल्याने माझ्या मनात शंकेची
पाल चुकचुकली (काय करणार माझ्याही स्वभावाला औषध नाहिये
)
) मी सारखी म्हणत होते की शेजारची रांग मोठी असून पुढे सरकते आहे.....शेवटी मीच न राहवून
तिथल्या कर्मचार्याला विचारले तेव्हा कळले की ती रांग आमच्याच विमानाची होती
पण वेब चेक इन केलेल्या लोकांची होती. अर्थातच आम्हाला त्या रांगेतून दुसर्या रांगेत जावे लागले.....
(आणि परिणामी वल्लभ आणि असीम ढाल घेऊन सज्ज झाले,कारण मी खूप वेळ सांगून
त्यांनी ऐकले नसल्यामुळे मी कधीही शाब्दिक तलवार चालवीन असे त्यांनाअनुभवामुळे वाटले. असणार).
त्यात वल्लभने -" आम्हाला मधली सीट द्या " त्याला आईल (रांगेत शेवटी असलेली) अशी हवी होती...
पण हवाई सुंदरीला काय वाटले कोणास ठाऊक तिने वेगवेगळया रांगांमधील मधल्या
सीटचे वाटप आम्हाला करून....मला माझ्या तलवारीला धार करायला
लावण्याची संधीच दिली. अर्थातच अबू धाबी पर्यन्त आम्ही तसाच प्रवास केला.
अबू धाबीला उतरलो आणि चक्क ज़ोरदार थंडी वाजू लागली. इतक्या उष्ण प्रदेशात आलो असूनही
तिथले विमानतळ मात्र खूपच थंड होते. आमच्यापैकी अनेकांनी आपले स्वेटर शाली टोप्या घातल्या....
तिथे आम्हाला आमच्या ग्रुपचे आधीच्या फ्लाइट ने आलेले सर्व जण भेटले. खरं म्हणजे त्यांच्या गप्पांच्या
आवाजाने आम्हाला आमचे गेट तिथेच असणार हे कळले. (आपण मराठी माणसे जिथे जातो तिथे
गप्पांचा फड रंगवू शकतो हेच खरे).इथे चांगला 6 तासांचा वेळ होता. त्यामुळे सगळ्यांचे खाणे पिणे,
शॉपिंग आणि बाकीचे विधी ही उरकून झाले. आणि उरलेला वेळ घाटे काकांनी लावलेल्या सुरेख(आणि सुरेल)
जुन्या हिन्दी गाणी ऐकत वेळ मस्त गेला. ( मला सुरुवातीला वाटल विमानतळावर ही गाणी लावली होती.....
म्हटले असतिल पॉप्युलर इथेही)
अबुधाबी ते लंडन हा जवळजवळ साडेसात तासांचा प्रवास होता. त्यामुळे तिथल्या हवाई सुंदरीशी जाउन
अस्मादिक बोलून आले. सीटचा घोळ निस्तरायला तिला विनंती केली आणि मला समुद्रातील किंवा
हवाई प्रवासाने होणारा त्रास आहे हेही सांगितले....
तिला माझ्या बोलण्यातला सच्चेपणा कळला का माझ्या चेहर्याकडे बघून (ही पामर बिचारी खरेच पिचलेली
दिसते असे वाटले असणार तिला) तिने आम्हाला म्हणजे मला आणि असीम ला आमची जागा बदलून दिली...
आणि वल्लभ ला त्याच्याच सीट वर बसायला लागले.....
सहन होईना आणि सांगता पण येईना अशी अवस्था झाली त्याची. आणि पहिल्या रांगेत जागा बसायला
जागा मिळाल्यामुळे आम्ही मनातल्या मनात वयं जितम्(यदा कदाचित स्टाइल मध्ये) ह्या आवेशात पाय लांब करून सीट वर पहुडलो
आणि साहेबांच्या देशाकडे झेप घेतली. हीथ्रो वर गेल्यागेल्या चहाची अशी तल्लफ आली होती की बस्स....
पण सगळ्यांना फ्रेश होता होता वेळ लागला. त्यामुळे सकाळी सकाळी थंड हवा असूनही चहा न घेता,
साहेबांच्या देशात इमिग्रेशनसाठी लाईनमध्ये उभे राहिलो. तिथेच सूरपूरियां आणि गांधी काकूंची
खाऊची बॅग रांगेत सारखी इकडे तिकडे फिरत होती (तिथल्याऑफिसरने बेवारस म्हणून ताब्यात घेण्या आधी
ती गांधी काकूंनी घेतली म्हणून बरे झाले.... कारण ट्रिपचे पुढचे सर्व दिवस त्यातला खाऊचा खजाना आम्ही
लुटत राहिलो) मला वाटत बॅगलाही कळले होते की पुढचे 15/16 दिवस त्यातला खाऊ असाच सगळ्यांकडे
फिरणार होता!!
भारतात इमिग्रेशनचे व्यवस्थापन खूपच चांगले आहे. त्या मनाने हीथ्रोवर त्यांना गर्दी सांभाळता येत नव्हती.
(लोकसंख्येचा परिणाम असेल) तासाभरात इमिग्रेशन करून आम्ही एअरपोर्टवरच एकदम फ्रेश झालो.
बर्याच जणांनी थंडीचे कपडे घातले होते....ताजेतवाने झाल्यावर एखाद-दोन फोटो काढल्यावर आम्ही
श्रीदेवच्या बरोबर लंडन सिटी फिरण्यासाठी निघालो. आमचे सामान घेत, स्वतःचे इतरांचे फोटो काढत
आम्ही भल्या मोठ्या गाडीत लहान मुलांच्या चेहर्यावर जशी पहिल्यांदा जत्रा पाहताना असते
तश्या उत्सुकतेने बसलो... आमच्या ह्या साहेबाच्या देशाच्या सफरीबद्दल पुढच्या भागात बोलू.
आत्ता तर प्र च्या प्रवासाला सुरुवात झालीये....आगे आगे देखो होता है क्या?!!...
सौ प्रगती वल्लभ जोशी
ReplyForward |

मस्तच 😊 युरोप ट्रिप च्या अविस्मरणीय आठवणी वाचायला मजा येते आहे.
उत्तर द्याहटवाअसीम ❤
हटवाToo good Pragati....Eagerly waiting for "Aage aage dekho hota hai kyaa" for Europe tour next blog.....😊😊😊
उत्तर द्याहटवाThanks a lot Vallabh ❤
हटवाखूपच मस्त प्रगती....पूर्ण युरोप तुझ्या नजरेतून बघायला आवडेल खूपच...पुढील भागाच्या प्रतीक्षेत...असेच खुमासदार वर्णन सदैव वाचायला मिळो😊❤️👌👌
उत्तर द्याहटवानक्किच दीपा . युरोपबद्दल लिहायचा प्रयत्न आहे . बाकी अनेक प्रवासांबद्दल नंतर लिहिनच ❤
उत्तर द्याहटवायथार्थ वर्णन आणि उत्सुकता वाढवणारी लेखन शैली.... छानच.... लिहीत रहा....😊😃
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद 🙏लिहण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे 😊
हटवाhurrey ekdam bhari varnan.... asech lihit raha pra....
उत्तर द्याहटवाRupa - Thanks dear!! Going to try writing it✍️
हटवायुरोप च आकर्षण वाढवणार सुंदर प्रवासवर्णन.
उत्तर द्याहटवाधन्यवाद अनिल! युरोप खरच सुंदर आहे!!
उत्तर द्याहटवा